Death of one by corona | Sarkarnama

संगमनेर पुन्हा हादरले ! मृत्यू झालेला वृद्ध कोरोनाबाधित

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 मे 2020

लाॅक डाऊनमध्ये मृत्यूनंतरही घशातील स्रावाचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा करता येईल.

संगमनेर : शहरातील आठ कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल "निगेटिव्ह' आल्याचा आनंद साजरा करणाऱ्या संगमनेरकरांना आज पुन्हा मोठा धक्का बसला. शहरापासून अवघ्या 12 किलोमीटरवरील धांदरफळ येथील 68 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
शहरातील एका नामांकित रुग्णालयात मंगळवारी (ता. 5) उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा संशय आल्याने, डॉक्‍टरांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात पाठवून त्याच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी मुंबईच्या खासगी प्रयोगशाळेत पाठविले होते. दरम्यान, त्या रुग्णाला नातेवाइकांनी घरी नेले होते. आज सकाळी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने त्याच्या तपासणीचा अहवाल मागविला. दुपारनंतर प्राप्त झालेल्या अहवालात ती व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सैलावलेले प्रशासन पुन्हा अलर्ट झाले. 
दरम्यान, लाॅक डाऊनमध्ये मृत्यूनंतरही त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा करता येईल. तोपर्यंत त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली. संबंधित रुग्ण दाखल असलेल्या शहरातील त्या रुग्णालयातील डॉक्‍टरांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

मोमीनपुऱ्यातील संशयित "निगेटिव्ह' 

श्वसनाच्या त्रासामुळे घुलेवाडीच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णाच्या घशातील स्रावाचा अहवाल "निगेटिव्ह' असल्याची माहिती पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालात देण्यात आली. संगमनेरातील गजबजलेल्या मोमीनपुरा परिसरात सापडलेल्या 41 वर्षीय संशयित रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्याने, त्याला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे मंगळवारी (ता. पाच) त्याच्या घशातील स्रावाचा नमुना पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेत पाठविला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून, तो "निगेटिव्ह' आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख