माॅलमध्ये गर्दी चालते, मंदिरे का वेठीस धरता : विखे पाटील - Crowds run in the mall, why hold temples close: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

माॅलमध्ये गर्दी चालते, मंदिरे का वेठीस धरता : विखे पाटील

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरासह राज्‍यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्‍थळे सरकारने सुरु करावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्‍यावतीने ‘दार उघड उध्‍दवा, दार उघड’ आंदोलन केले.

शिर्डी : कोणत्‍याही संवेदना नसलेल्‍या महाविकास आघाडी सरकारने आध्‍यात्मिक क्षेत्रालाही वेठीस धरले आहे. सरकार बदल्‍यांसाठी ‘मंत्रालय’ सुरु करते, पण भाविकांसाठी मंदिर बंद ठेवते. मॉलमध्‍ये झालेली गर्दी सरकारला चालते, मंदिर सुरु करतानाच भाविकांच्‍या गर्दीची भिती का दाखविली जाते? असा सवाल करत भाविकांच्‍या ‘श्रध्‍देचा सन्‍मान’ आणि व्‍यवसायीकांच्‍या ‘भावना’ लक्षात घेवून तातडीने मंदिर आणि प्रार्थनास्‍थळे सुरु करा, अन्‍यथा पुढील आंदोलन टाळ, मृदुंगासह वर्षा बंगल्‍यासमोर आम्‍हाला करावे लागेल, असा इशारा माजी मंत्री आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला.

शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरासह राज्‍यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्‍थळे सरकारने सुरु करावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्‍यावतीने ‘दार उघड उध्‍दवा, दार उघड’ आंदोलन केले. नगरपंचायत कार्यालयापासुन आमदार विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली नगरसेवक, ग्रामस्‍थ आणि वारकऱ्यांनी टाळ, मृदुंगांचा गजर करत साईबाबा मंदिराच्‍या प्रवेशव्‍दारासमोर आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात घोषणा देण्‍यात आल्‍या. साईनामाचा गजर करुन या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्‍यात आले.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्‍यक्षा अर्चना कोते, उपनगराध्‍यक्ष मंगेश त्रिभूवन, भाजयुमोचे प्रदेश उपाध्‍यक्ष सचिन तांबे, भाजपाच्‍या ओबीसी आघाडीचे उपाध्‍यक्ष प्रकाश चित्‍ते, शिवाजी गोंदकर, कैलासबापू कोते, शिवाजी गोंदकर, सुजीत गोंदकर, नितीन कोते, ज्ञानेश्‍वर गोंदकर, प्रताप जगताप आदिंसह पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

विखे पाटील म्‍हणाले की, मंदिर उघडावीत, या मागणीसाठी रस्‍त्‍यावर येवून आंदोलन करावे लागते हे दुर्दैव आहे. सत्‍तेवर बसलेल्‍या बहिऱ्या, मुक्‍या, आंधळ्या महाविकास आघाडी सरकारला कोणत्‍याही संवेदना नाहीत. पाच महिन्‍यांपासून मंदिरे, प्रार्थनास्‍थळे बंद आहेत. या तिर्थक्षेत्राच्‍या ठिकाणचे अर्थकारण थांबले आहे. व्‍यवसायीक अडचणीत सापडले आहेत. त्‍यांना दिलासा देण्‍यासाठी मंदिरे सुरु करण्‍याची आज खरी गरज आहे. पण सरकार ‘मदिरालय’ सुरु करते पण मंदिर बंद ठेवते. सरकार कोणताही निर्णय डोके ठिकाणावर ठेवून घेत नाही, अशी टीका करुन, बदल्‍यांसाठी मंत्रालय उघडणाऱ्या सरकारला भाविकांसाठी मंदिर उघडावीशी वाटली नाहीत, असे विखे पाटील म्हणाले.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्‍हणाले, की लाखो भाविकांच्‍या भावनेचा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. राज्‍यातील आघाडी सरकारकडे मागून काही मिळत नाही. आता परमेश्‍वराकडे तरी आम्‍हाला काही मागु द्या, असा टोला लगावून आम्‍हाला परमेश्‍वराकडे प्रार्थना करण्‍याचा संधी द्या, असे ते म्हणाले.

तर आम्ही न्यायालयात जाणार

विखे पाटील म्‍हणाले की, सरकारला जर कायद्याचीच भाषा कळत असेल, तर मंदिरं सुरु करण्‍याच्‍या मागणीसाठी वेळ पडली, तर आम्‍ही न्‍यायालयात जाणार आहोत. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या परिक्षांच्‍या संदर्भात दिलेल्‍या निर्णयाचे स्‍वागत करुन सरकार चालविताना एक भूमिका घेवून पुढे जावे लागते. कोणाच्‍या बालहट्टापायी राज्‍यालाच वेठीस धरणे योग्‍य नव्‍हते, अशी प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
 

Edited by - Murlidhar karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख