Criticism of Sharad Pawar hurts BJP's Madhukarrao Pitchad | Sarkarnama

शरद पवार यांच्यावरील टीकेने भाजपचे मधुकरराव पिचड व्यथीत, पडळकरांना सुनावले खडे बोल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 जून 2020

आपण भाजपमध्ये गेलो असलो, तरी शरद पवार यांना आपण जवळून पाहिले आहे. सर्वसामान्य, शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान नाकारून चालणार नाही.

अकोले : गेले अनेक वर्षे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहून राष्ट्रवादीचा चेहरा बनलेले माजी मंत्री व नव्याने भाजपवासी झालेले मधुकरराव पिचड यांनी आज पवार यांच्यावरील टीकेचा निषेध केला आहे. स्वतः भाजपमध्ये असतानाही भाजपच्या आमदारांनी पवार यांच्यावरील केलेली टीका पिचड यांना मात्र रुचली नाही. त्यांनी या घटनेचा निषेध करून मनाला दुःख झाल्याचे म्हटले आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार यांच्यावर टीका केली होती. या घटनेचा राज्यातून अनेक संघटनांकडून, राष्ट्रवादी पक्षाकडून तसेच काॅंग्रेस नेत्यांनीही निषेध केला. गेल्या आठवडाभरापासून निषेध व्यक्त होत असताना आज अखेर भाजपचे नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राजूर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पिचड म्हणाले, ""आपण भाजपमध्ये गेलो असलो, तरी शरद पवार यांना आपण जवळून पाहिले आहे. सर्वसामान्य, शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान नाकारून चालणार नाही. ते देशव्यापी नेतृत्व असून, (स्व.) यशवंतराव चव्हाण, (स्व.) वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्यानंतर शरद पवार यांचे नेतृत्व सर्व जातिधर्मांना, सर्वांना बरोबर घेऊन राजकारण, समाजकारण करणारे राहिले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दुःख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणे, ही आता "फॅशन' बनली आहे. पवार हे देशव्यापी नेतृत्व आहे. त्यांच्यावरची टीका दुर्दैवी आहे.``

पडवळकरांनी आपली कुवत पाहून बोलावे

देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणे योग्य नाही. हे निषेधार्थ आहे, असे सांगून पिचड म्हणाले, की मी राजकारणातून निवृत्त झालो असलो, तरी अशा घटनांनी मन व्यथित होते. गेल्या 40 वर्षांचा अनुभव आणि सध्या वय 80 आहे. त्यात आपण पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. अशा टीकांनी ते कधीच अस्थिर झाले नाहीत. मोठ्या माणसांबाबत बोलताना आपली कुवत पाहून बोलावे.''

दरम्यान, पिचड आता भाजपमध्ये असले, तरी त्यांनी केलेले वक्तव्य आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. शरद पवार यांच्यावरील टीका ते सहन करू शकले नाहीत, यातच पवार यांच्यावरील पिचड यांचे प्रेम दडलेले आहे, याबाबत आज तालुक्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख