मुंबईचं वऱ्हाडच कोपरगावात घुसलं, गुन्हे दाखल होऊन क्वारंटाईन होऊन बसलं

पोलिसांनी संपूर्ण वऱ्हाड आणि वधूपित्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण वऱ्हाडच पोलिस ठाण्यात आणून त्यांना रात्री उशिरा क्वारंटाईन करण्यात आले आहे.
vivah
vivah

कोपरगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केलेल्या असताना आज मुंबईचं एक वऱ्हाडच बेकायदा नगर जिल्ह्यात घुसलं. एव्हढंच नव्हे, तर कोपरगाव तालुक्यातील एका गावात येवून लग्नासही सुरुवात झाली. कोपरगावचा नवरदेव असल्याचे सांगून शासनाची फसवणूक केली. मात्र चानक्ष प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण वऱ्हाडावर गुन्हा दाखल करून त्यांना क्वारंटाईन केले.

नवरदेव मुंबईचा असताना कोपरगावचा असल्याचे तहसीलदारांना खोटेच सांगून लग्नाची परवानगी घेणे, शासनाची परवानगी किंवा ई-पास न घेता वऱ्हाडाचा मुंबईहून कोपरगावपर्यंतचा प्रवास आदी बाबी तालुक्‍यातील मुर्शतपूर येथील उत्तम भालेराव कुटुंबीयांना महागात पडल्या. पोलिसांनी संपूर्ण वऱ्हाड आणि वधूपित्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण वऱ्हाडच पोलिस ठाण्यात आणून त्यांना रात्री उशिरा क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

आरोपी उत्तम नबाजी भालेराव, राजू नारायण सरोदे, अलका राजू सरोदे, अमृत रवींद्र सरोदे, रमेश गोडू धायेकर (सर्व रा. माटुंगा लेबर कॅम्प, ई वॉर्ड, मुंबई), रंजना विजय गायकवाड, शीतल विजय गायकवाड, सागर विजय गायकवाड (सर्व रा. अक्षदा केणे चाळ, मिलिंदनगर, कल्याण पश्‍चिम), आकाश राजू सरोदे, शुभम उत्तम भालेराव, संगीता उत्तम भालेराव, आश्‍लेषा उत्तम भालेराव, प्रेरणा उत्तम भालेराव (सर्व रा. मुर्शतपूर, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुर्शतपूरचे तलाठी धनंजय गुलाबराव पऱ्हाड यांनी फिर्याद दिली. 

फिर्यादीत दिलेली माहिती अशी ः तालुक्‍यातील मुर्शतपूर येथील उत्तम नबाजी भालेराव यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नास परवानगी मिळावी म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे 19 मे रोजी अर्ज केला होता. नवरदेव कोपरगाव तालुक्‍यातील असल्याचे खोटेच सांगितले. तहसीलदारांनी अटी व शर्तींवर 26 मे रोजी लग्न करण्याची परवानगी दिली. ठरल्याप्रमाणे लग्नाचा दिवस जवळ आला; परंतु वऱ्हाड मुंबईहून येणार असल्याची कुजबूज ग्रामस्थांमध्ये सुरू झाली. मुंबईहून दोन मोटारींमधून 10 ते 12 वऱ्हाडी गावात दाखल झाले.

दरम्यान, तहसीलदार योगेश चंद्रे यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली, की उत्तम भालेराव यांची कन्या व मुंबई येथील नवरदेवाचा लग्नसमारंभ सुरू आहे. तहसीलदार चंद्रे, पोलिस पाटील गोरख दवंगे, ग्रामसेवक सुनील राजपूत, ग्रामस्थ अनिल दवंगे घटनास्थळी गेले असता वेगळेच चित्र दिसले. नवरदेव कोपरगावचा असल्याचे सांगून वऱ्हाड चक्क मुंबईचे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी संपूर्ण वऱ्हाडच पोलिस ठाण्यात आणले. 

मुंबईहून येताना वऱ्हाडाने शासनाची कोणतीही परवानगी किंवा ई-पासही घेतला नव्हता. शासनाला खोटी माहिती पुरविणे, कोरोना संसर्ग कायद्याचे उल्लंघन, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन, तसेच शासनाच्या दळणवळण नियम व अटी-शर्तींचे उल्लंघन आदी कलमांन्वये पोलिसांनी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com