नगर : बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गर्दी जमवून विजयी उमेदवारांचा सत्कार केला. त्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले व पुतणे संदीप कर्डिले यांच्यासह 32 जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस कर्मचारी अजय नारायण नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की बुऱ्हाणनगर येथे बुधवारी रात्री नऊ वाजता वरील आरोपींनी ग्रामपंचायत निवडणुकीत बाणेश्वर ग्रामविकास पॅनलच्या विजयी उमेदवारांचा ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात, विनापरवाना एकत्र येऊन सत्कार केला. जमावाने विजयी उमेदवारांचा फेटे बांधून सत्कार करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. पोलिस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी तपास करीत आहेत.
हेही वाचा..
"गड आला, पण सिंह गेला'
राहुरी : तालुक्यातील 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे सन 2020 ते 25 या पाच वर्षांसाठीचे आरक्षण आज जाहीर झाले. वांबोरी ग्रामपंचायतीत नुकतेच सत्तांतर झाले; परंतु बहुमत असूनही आरक्षणाचा सदस्य विरोधातील असल्याने, "गड आला, पण सिंह गेला' अशी सत्ताधाऱ्यांची स्थिती झाली आहे.
राहुरी येथे पालिकेच्या केशररंग मंगल कार्यालयात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आरक्षणाची सोडत काढली. नायब तहसीलदार गणेश तळेकर, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे उपस्थित होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे सरपंचपदाची आरक्षण सोडत काढताना, सन 1995पासून मागील पाच पंचवार्षिकमध्ये पडलेले आरक्षण विचारात घेण्यात आले. मागील पंचवीस वर्षांत अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाचे आरक्षण झालेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आले. त्यात 2011च्या जनगणनेनुसार जातीनिहाय लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने टक्केवारीनुसार आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नंतर स्त्री व पुरुष आरक्षण चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले. उंबरे, धानोरे, मल्हारवाडी येथे झालेल्या आरक्षणाचा एकही सदस्य नसल्याने, तेथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीची अद्याप निवडणूक झालेली नाही. त्यामुळे तेथील सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली नाही. महाराष्ट्रातील अनेक आरक्षण आज जाहीर झाले आहे.
ग्रामपंचायतनिहाय आरक्षण असे :
अनुसूचित जाती (पुरुष) : ताहाराबाद, कुक्कडवेढे, वांबोरी, चेडगाव, केंदळ खुर्द. (महिला) : मांजरी, मल्हारवाडी, मुसळवाडी, वळण, खुडसरगाव, चिंचाळे.
अनुसूचित जमाती (पुरुष) : वरशिंदे- वाबळेवाडी, रामपूर, कात्रड, केंदळ बुद्रुक, खडांबे खुर्द. (महिला) : मालुंजे खुर्द, शिलेगाव, धानोरे, ब्राह्मणगाव भांड, उंबरे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) : तुळापूर, पिंपळगाव फुणगी, आंबी, चांदेगाव, चिंचविहिरे, कणगर बुद्रुक, वावरथ, जांभळी-जांभूळबन, पिंप्री वळण, करजगाव, गणेगाव. (महिला) : सोनगाव, सडे, धामोरी खुर्द, वडनेर, मोमीन आखाडा, चिखलठाण, दरडगाव थडी, टाकळीमिया-मोरवाडी, बाभूळगाव, कानडगाव, डिग्रस.
सर्वसाधारण (पुरुष) : सात्रळ, निंभेरे, तांदूळनेर, तांभेरे, कोळेवाडी, घोरपडवाडी, बारागाव नांदूर, कोंढवड, तांदूळवाडी, वरवंडी, खडांबे बुद्रुक, गुंजाळे, संक्रापूर, दवणगाव, केसापूर, बोधेगाव, लाख, पाथरे खुर्द, कोपरे, तिळापूर. (महिला) : गुहा, कुरणवाडी, म्हैसगाव, राहुरी खुर्द, मानोरी, देसवंडी, तमनर आखाडा, पिंप्री अवघड, ब्राह्मणी, मोकळ ओहोळ, धामोरी बुद्रुक, चिंचोली, गंगापूर, अंमळनेर, जातप, माहेगाव, वांजूळपोई, कोल्हार खुर्द, आरडगाव.
Edited By - Murlidhar Karale

