निळवंडे प्रकल्पाचे श्रेय फक्त थोरातांचेच : आमदार तांबे - Credit for Nilwande project belongs only to Thorat: MLA Tambe | Politics Marathi News - Sarkarnama

निळवंडे प्रकल्पाचे श्रेय फक्त थोरातांचेच : आमदार तांबे

आनंद गायकवाड
शनिवार, 13 मार्च 2021

1995 ते 99 या भाजप सरकारच्या काळात "निळवंडे'साठी काहीच काम झाले नाही. 1999मध्ये बाळासाहेब थोरात यांनी प्रथम राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, "आधी पुनर्वसन, मग धरण' या उद्देशाने प्रकल्पग्रस्तांना स्वतःची पाच एकर जमीन देत कामाची सुरवात केली.

संगमनेर : "निळवंडे धरण व कालव्यांच्या कामासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला. प्रकल्पाला जीवनाचे ध्यासपर्व मानले. 2023पर्यंत दुष्काळी भागाला पाणी देण्याचा ध्यास थोरात यांनी घेतला असून, निळवंडे धरण व कालव्यांच्या कामाचे श्रेय फक्त त्यांनाच जाते,'' असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. 

राज्याच्या अर्थसंकल्पात निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी केलेल्या भरीव तरतुदीबाबत बोलताना डॉ. तांबे म्हणाले, "तालुक्‍यातील तळेगाव या दुष्काळी पट्ट्याला निळवंडे धरणाचे पाणी मिळावे, अशी आग्रही भूमिका दिवंगत भाऊसाहेब थोरात यांची होती. 1995 ते 99 या भाजप सरकारच्या काळात "निळवंडे'साठी काहीच काम झाले नाही. 1999मध्ये बाळासाहेब थोरात यांनी प्रथम राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, "आधी पुनर्वसन, मग धरण' या उद्देशाने प्रकल्पग्रस्तांना स्वतःची पाच एकर जमीन देत कामाची सुरवात केली. अनेक अडथळ्यांनंतर मात करीत 2012मध्ये निळवंडे धरण पूर्ण झाले. या कामी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे सहकार्य लाभले. 

हेही वाचा... विखेंनी काय मध्यस्थी केली

2014 ते 19 या काळात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या दुर्लक्षामुळे काम पुन्हा रेंगाळले. या काळातही कालव्यांची कामे मार्गी लावण्यासाठी थोरात यांनी वेळोवेळी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधले. 2019मध्ये सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्रिपदाची जबाबदारी घेताच, पहिल्याच दिवसापासून थोरात यांनी निळवंडे कालव्यांच्या कामांना गती दिली. 2020मध्ये कोरोनाच्या जागतिक संकटामुळे कामाची गती मंदावली, तरी अकोले तालुक्‍यातील कामांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.'' 

हेही वाचा... निळवंडेसाठी 365 कोटींची तरतूद

"या वर्षीच्या अर्थसंकल्पात धरणाच्या इतिहासातच प्रथमच 476 कोटींचा भरीव निधी सरकारकडून मंजूर करून घेतला. कोणतीही प्रसिद्धी, गाजावाजा न करता कालव्यांची कामे पूर्ण करून 2023 पर्यंत दुष्काळी भागाला पाणी देण्याचा ध्यास थोरात यांनी घेतला आहे,'' असे तांबे म्हणाले. 

दरम्यान, निळवंडेच्या कामाचे श्रेय घेण्यापासून जिल्ह्यातून काही नेते पुढे येतील, त्यामुळे या कामाचे श्रेय कोण-कोण घेणार, याबाबत राजकीय गोटातून चर्चा होणार आहे. निळवंडेची अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे आगामी काळात ही कामे पूर्ण करण्याची गरज आहे. त्यासाठी नेत्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

 

Edited By- Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख