नगर तालुका : तालुक्यातील बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले यांनी आव्हान दिले होते. मात्र, कर्डिले यांनी पुतण्याचे आव्हान यशस्वीरीत्या परतवून लावले.
बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी माजी आमदार कर्डिले व त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले यांच्या पॅनलमध्ये लढत झाली. शिवाजी कर्डिले यांच्या गटाने पुतण्याच्या पॅनलचा धुव्वा उडवीत ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली. प्रचारात रोहिदास यांनी आघाडी घेतल्याचे दिसत होते. मात्र, ऐन वेळी राजकीय डावपेच टाकत शिवाजी कर्डिले यांच्या गटाने सर्वच जागांवर विजय मिळविला. शिवाजी कर्डिले यांनी चुलतसुनेचा पराभव करण्यासाठी स्वीय सहायकाच्या पत्नीला उभे केले होते. या निवडणुकीत त्यांनी सुनेचाही पराभव केला.
हेही वाचा..
शेवगावात प्रस्थापितांना धक्का
शेवगाव : तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीचे निकाल अनेक ठिकाणी धक्कादायक लागले. प्रस्थापित उमेदवारांना नवख्या तरुणांनी पराभूत केले. भातकुडगाव, घोटण, चापडगाव, आखतवाडे, ठाकूर निमगाव, पिंगेवाडी, निंबेनांदूर येथे सत्तांतर झाले. पिंगेवाडी येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तर आखतवाडे येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब सोनवणे यांच्या मंडळाचा दारुण पराभव झाला. बहुतांश गावांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व मिळविले. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
भातकुडगाव येथे विठ्ठल फटांगरे यांच्या नेतृत्वाखालील माऊली परिवर्तन मंडळाने दहा जागा जिंकल्या. विरोधी राजेश फटांगरे यांच्या ज्ञानेश्वर मंडळास तीन जागांवर समाधान मानावे लागले. चापडगाव येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भरत लोहकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या जगदंबा मंडळाने नऊ जागा जिंकत सत्तांतर केले. येथे बाळासाहेब मुंदडा, पंडित नेमाणे व संतराम गायकवाड यांच्या रेणुकामाता मंडळास अवघ्या दोन जागा मिळाल्या. प्रभाग दोनमधील उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे जगदंबा मंडळाचे शहादेव पातकळ विजयी झाले.
घोटण येथे लक्ष्मण टाकळकर, अशोक मोटकर, संजय टाकळकर यांच्या मल्लिकार्जुनेश्वर महाविकास आघाडीस आठ जागा मिळाल्या. अरुण घाडगे, रणजित घुगे, कुंडलिक घुगे यांच्या मल्लिकार्जुनेश्वर शेतकरी मंडळास पाच जागा मिळाल्या. हातगाव येथे राजेंद्र भराट, शिवाजी भराट यांच्या नम्रता ग्रामविकास मंडळास सात, तर किसन अभंग, भाऊसाहेब मुरकुटे यांच्या हत्तेश्वर ग्रामविकास मंडळास सहा जागा मिळाल्या.
पिंगेवाडी येथे नंदकुमार मुंढे व अशोक तानवडे यांच्या ज्ञानेश्वर भगवानबाबा मंडळाने सर्व नऊ जागांवर विजय मिळविला. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या मंडळाचा दारुण पराभव झाला. आखतवाडे येथे रघुवीर उगले यांच्या भैरवनाथ परिवर्तन मंडळाने सर्व नऊ जागा जिंकल्या.
ठाकूर निमगाव येथे संभाजी कातकडे व लक्ष्मण मडके यांच्या परिवर्तन मंडळास सहा, तर गहिनीनाथ कातकडे यांच्या मंडळास तीन जागा मिळाल्या. निंबेनांदूर येथे राजाजी बुधवंत व भाऊसाहेब चेके यांच्या ज्ञानेश्वर मंडळास पाच, तर कैलास बुधवंत यांच्या शनैश्वर मंडळास चार जागा मिळाल्या. ढोरजळगाव-शे ग्रुप ग्रामपंचायतीत डॉ. सुधाकर लांडे, राजेंद्र देशमुख यांच्या ज्ञानेश्वर ग्रामविकास मंडळास नऊ, तर बापूसाहेब पाटेकर यांच्या मंडळास दोन जागा मिळाल्या. कांबी येथे बप्पासाहेब पारनेरे यांच्या विश्वासानंद मंडळास नऊ, तर सुरेश होळकर यांच्या सद्गुरू विश्वासानंद मंडळास दोन जागा मिळाल्या. भावीनिमगाव येथे मिलिंद कुलकर्णी यांच्या मंडळाने सर्व 11 जागांवर विजय मिळविला.
Edited By - Murlidhar Karale

