Corona's patient in Revenue Minister Thorat's constituency | Sarkarnama

महसूलमंत्री थोरात यांच्या मतदारसंघात कोरोनाचा धुमाकूळ

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 मे 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 52 रुग्ण सापडले, त्यापैकी एकट्या संगमनेरमधील 15 रुग्णांचा समावेश आहे. सध्या संगमनेर परिसरातील सात रुग्ण उपचार घेत आहेत. एकाचा मृत्यू झाला, तर यापूर्वी आठजण डिस्चार्ज झाले आहेत.

नगर : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेरमध्ये सध्या कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 52 रुग्ण सापडले, त्यापैकी एकट्या संगमनेरमधील 15 रुग्णांचा समावेश आहे. सध्या संगमनेर परिसरातील 7 रुग्ण उपचार घेत आहेत. एकाचा मृत्यू झाला, तर यापूर्वी 8 जण डिस्चार्ज झाले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना आटोक्‍यात येत असताना शुक्रवारी एकाच दिवसात आणखी सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नव्याने आढळलेले सर्व रूग्ण संगमनेर परिसरातील असल्याने संगमनेरसह कुरण व धांदरफळ हा परिसर सीलबंद करीत 22 मे पर्यंत हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. 
संगमनेर येथील एक महिला व धांदरफळ येथील चार जण असे पाच जण कोरोना बाधित आढळून आले. त्यानंतर अवघ्या काही तासातच उर्वरित पाच व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला. यात दोन व्यक्ती बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे काल दिवसभरात जिल्ह्यात एकूण सात रुग्ण आढळून आले. अहवालानुसार बाधित व्यक्तीमध्ये 28 वर्षीय महिला व 5 वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे दोन्ही बाधित धांदरफळ येथील आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 52 झाली आहे. दरम्यान, बाधित व्यक्ती गुरूवारी संगमनेर येथे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईक आहेत.

अत्यावश्‍यक सेवा वस्तू विक्रीला बंदी
संगमनेर शहरातील ईस्लामपुरा, कुरण रोड, बिलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, कुरण, धांदरफळ हे क्षेत्र हॉटस्पॉट घोषित केला. दोन किलोमीटर चा परिसर हा कोअर एरिया म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घोषित केला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्‍यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी आजपासून ते 22 मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

थोरात यांच्याकडून सातत्याने आढावा
दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रत्येक आठवड्यास शनिवार व रविवारी मतदारसंघात आवर्जुन भेटी देतात. इतर वेळी मुंबईत राज्याचे कामे असतात. त्याचप्रमाणे रोज चार तास राज्यभराचा आढावा घेतात. दिवसातून किमान एकदा तरी संगमनेर येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीतीचा आढावा घेतात. असे असले, तरी कोरोनाचे रुग्ण या तालुक्यात वाढतच आहेत.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख