Corona's numbers dwindled, though, gathering in the opponents' stomachs | Sarkarnama

कोरोनाचे आकडे कमी झाले, तरी विरोधकांच्या पोटात गोळा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 जून 2020

विरोधी पक्ष केवळ सरकार अडचणीत आणण्याचाच प्रयत्न करतात. कोरोना बाधितांचे आकडे कमी झाले, तरी विरोधकांच्या पोटात गोळा येतो.

नगर : "राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन-प्रशासन अहोरात्र लढत आहे. परंतु, विरोधी पक्ष केवळ सरकार अडचणीत आणण्याचाच प्रयत्न करतात. कोरोना बाधितांचे आकडे कमी झाले, तरी विरोधकांच्या पोटात गोळा येतो,`` असा आरोप ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी उपस्थित होते. 

मुश्रीफ म्हणाले, ``कोरोना महामारीचे संकटावर मात करण्यासाठी अधिकृतरीत्या औषध उपलब्ध होत नाही, तोपर्यंत परिस्थिती आटोक्‍यात येणार नाही. त्यामुळे उपाययोजनांसंदर्भात नागरिकांनी दक्षता घ्यावी. एक जूनला जिल्हा कोरोनामुक्त होईल, असे वाटले होते. मात्र, त्यास नजर लागली. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. त्यातूनच जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल.``

कोरोनामुळे रखडलेली कर्जमुक्ती लवकरच

ते म्हणाले, की कोरोना संकटामुळे कर्जमुक्ती योजनेत 47 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम रखडले. त्यांना कर्जमाफीचा थेट लाभ मिळाला नसला, तरी त्यांच्या खात्यावरील कर्ज सरकारच्या नावे लावून पीक कर्ज तत्काळ शेतकऱ्यांना देण्याचे बॅंकांना बजावण्यात आले. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य पुरवठा सुरू आहे. ज्यांना शिधापत्रिका नाहीत, अशा व्यक्तींना देखील धान्यपुरवठा करण्याची व्यवस्था केली. स्वस्त धान्य दुकानदारांनाही मागणीप्रमाणे कोरोना परिस्थितीत 50 लाखांचा विमा देऊन दिलासा दिला जाणार आहे. राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक कोरोनामुळे सध्या स्थगित आहे, अशा ग्रामपंचायतींचे कामकाज व्यवस्थितरीत्या सुरू राहण्यासाठी तेथे प्रशासक नेमले जातील.

नाभिक समाजाला मदत केली जाईल

नाभिक समाजाचे सलून सध्या बंद आहे. त्यामुळे त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीची जाणीव सरकारला आहे. या परिस्थितीत नाभिक समाजाला योग्य ती मदत केली जाईल. यंदा आवश्‍यक त्या प्रमाणात जिल्ह्यात खते, बियाणे उपलब्ध असेल. युरिया खताची कमी पडणार नाही. खरीप हंगाम पेरणीसंदर्भात जिल्ह्यात काटेकोर नियोजन करण्यात आले.''

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख