नगर : जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून, आज जिल्ह्यात 24 रुग्ण नव्याने सापडले. नगर शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. काल जिल्ह्यातील एका आमदारांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. आज त्यांच्या साैभाग्यवतींची तपासणी केली असता त्यांचा अहवालही पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संबंधितांच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासन शोध घेत आहे.
नगर जिल्ह्यातील सकाळी आलेल्या अहवालात 12 रुग्ण पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. नगर शहराजवळील नवनागापूर येथे 3, शहरातील पद्मानगर येथील 2, संगमनेर तालुक्यातील नाईकवाडापुरा येथील 1, श्रीरामपूर येथील 1, राहाता 1, पाथर्डी तालुक्यातील 2 असे रुग्ण आढळून आले होते. सायंकाळी आलेल्या अहवालात 13 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. त्यामुळे आता जिल्ह्याची रुग्णसंख्या 590 झाली आहे. तसेच बरे झालेल्यांची संख्या 400 असून, सध्या 174 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 16 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
डाॅक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय चाचणी करता येणार
दरम्यान, आज जिल्हा प्रशासनाने कोरोनाविषयक प्रयोगशाळा व वैद्यकीय व्यावसायिकांसाठी काही सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार नागरिकांना डाॅक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय कोरोनाविषयक चाचणी करता येणार आहे. तसेच लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना चाचणी अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक चाचण्या होण्यास मदत होणार आहे.
या निर्णयामुळे एखाद्या रुग्णाला तपासणी करावयाची असल्यास व त्याला काहीही त्रास होत नसल्यास तपासणीसाठी घशातील स्त्राव घेतल्यानंतर लगेचच रुग्णालयात भरती करण्याची गरज पडणार नाही. त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांना होम क्वारंटाईन करता येणार आहे. संबंधित प्रयोगशाळेने त्याच्या हातावर शिक्का मारून त्याला होम क्वारंटाईन करण्याबाबत सूचविले जाईल. तसेच संबंधित रुग्णाची माहिती शासकीय रुग्णालयाला कळविली जाईल. प्रत्येक रुग्णाची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याने कोणताही रुग्ण प्रशासनाच्या नजरेतून सुटणार नाही.
लोकांची भिती जाण्यास मदत होणार
आज झालेल्या निर्णयामुळे लोकांमधील कोरोनाविषयक भिती दूर होण्यास मदत होणार आहे. काही लक्षणे आढळले तरीही रुग्णालयात भरती होण्याच्या भितीने काही लोक तपासणी करण्याचे टाळत होते. तथापि, आज झालेल्या निर्णयामुळे रुग्णाचा अहवाल आल्याशिवाय त्यांना रुग्णालयात थांबण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे लोक चाचण्या करण्यासाठी पुढे येतील. यापूर्वी बाहेरगावहून आलेले नागरिक प्रशासनाला न कळविता घरीच थांबत होते. तेही आता तपासणी करण्यासाठी पुढे येवू शकणार आहेत.

