कोरोनाचा आलेख चढता ! एकाच दिवशी नगरमध्ये आढळले 66 बाधित - Corona's graph goes up! 66 infected found in town on the same day | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचा आलेख चढता ! एकाच दिवशी नगरमध्ये आढळले 66 बाधित

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 10 जुलै 2020

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला आदेश देऊन तपासण्या वाढविण्याचे नियोजन केले आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख चढताच आहे. काल दिवसभरात 66 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या 794 झाली आहे. रुग्ण संख्या वाढतच असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.

कोरोनाला आवर घालण्यासाठी पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करीत आहे. आपल्या जीवावर उदार होऊन अधिकारी, कर्मचारी काम करीत असताना कोरोनाला थांबविणे अशक्य होत आहे. जिल्ह्यात कोरोनाविषयक तपासणीसाठी प्रयोगशाळा झाल्यामुळे जास्त रुग्णांची रोज तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे आकडाही वाढलेला दिसतो. अर्थातच कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे यावरून दिसून येते. जास्तीत जास्त तपासण्या झाल्या, तर बाधित रुग्ण लवकर समजतील. त्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही. याबात काल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला आदेश देऊन तपासण्या वाढविण्याचे नियोजन केले आहे. संगमनेरमध्येही त्यांनी भेट देवून तो परिसर लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे नियोजन केले आहे.

काल रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार दिवसभरात 66 रुग्ण आढळले. त्यामध्ये नगर शहरातील 13, भिंगार 1, सोनई येथील 10, संगमनेरमधील 9, श्रीगोंद्यात 2, शेवगाव 1 रुग्णांचा समावेश आहे. 

नगर शहरात वाढते रुग्ण

नगर शहरातील सारसनगर, पद्मानगर, सिद्धार्थनगर, चितळेरोड, टिळकरोड, सावेडी, भिंगार आदी परिसरात काल रुग्ण आढळले आहेत. चितळेरोड येथे 6 रुग्ण आढळल्याने या परिसरावर प्रशासनाने पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या तोफखाना परिसर हाॅट स्पाॅट केलेला आहे. त्या बाजुचा परिसर बफरझोन म्हणून घोषित केलेला आहे. दिल्लीगेट, नालेगाव आदी परिसर यापूर्वी हाॅट स्पाॅट होता, तथापि, आता तो बफर झोनमध्ये आलेला आहे. काल सकाळी आलेल्या अहवालात अरणगाव रोड, केडगाव, सर्जेपुरा, तारकपूर, गवळीवाडा येथे रुग्ण आढळले आहेत. नगर शहरातील दाटीवाटीच्या लोकसंख्यामुळे हा परिसर कोरोनामुक्त होण्यास वेळ लागू शकतो. परंतु उपनगरांमध्येही रुग्ण आढळू लागल्याने तेथे उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

संगमनेरमधील हिवरगाव पावसा, गुंजाळ मळा, कासारा दुमाला, मिर्झापूर, घुलेवाडी, चास पिंपळदरी येथे नव्याने रुग्ण आढळले आहेत. श्रीगोंदे तालु्क्यातील चिंभळा, चांबूर्डी येथे रुग्ण नव्याने आढळले आहेत. शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथेही रुग्ण आढळून आला आहे. 

सध्या जिल्ह्यात 280 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 20 लोकांचा मृत्यू झालेला आहे. नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद, होमिओपॅथीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख