नगर जिल्ह्यात कोरोनाचा या वर्षीचा उच्चांक, एकाच दिवशी 15 जणांचा मृत्यू - Corona this year’s peak in the Nagar district, with 15 deaths in a single day | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात कोरोनाचा या वर्षीचा उच्चांक, एकाच दिवशी 15 जणांचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

नगर जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाच्या 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन हजार 233 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवशी एवढे रुग्ण आणि मृत्यू होण्याचा या वर्षीचा हा उच्चांक आहे. 

नगर : जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाच्या 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन हजार 233 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवशी एवढे रुग्ण आणि मृत्यू होण्याचा या वर्षीचा हा उच्चांक आहे. 

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत 859, खासगी प्रयोगशाळेत 549, अँटीजेन चाचणीत 825 रुग्ण आढळून आले. सर्वाधिक रुग्ण नगर शहरातील 611 आहेत. कर्जत तालुका रुग्ण संख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कर्जतमध्ये 201 रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे : संगमनेर 198, नगर 187, अकोले 128, राहाता 117, पाथर्डी 114, राहुरी 107, शेवगाव 103, कोपरगाव 99, श्रीरामपूर 79, पारनेर 70, नेवासे 55, जामखेड 47, श्रीगोंदे 40 आढळून आले आहेत. भिंगार उपनगरात 54, लष्करी रुग्णालय 6, बाहेरील जिल्ह्यातील 17 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1 लाख 9 हजार 401 झाली आहे. आतापर्यंत एक हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या 11 हजार 637 झाली आहे. 

दिवसभरात एक हजार 319 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 96 हजार 494 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88. 20 टक्के झाले आहे. 

चिचोंडी पाटीलमध्ये वाढणार 30 बेड 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या कोविड सेंटरमधील बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नव्याने 30 बेड तेथे वाढविण्यात येणार आहेत. 

चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने, बेडची संख्या अपुरी पडत आहे. ती वाढविण्याच्या दृष्टीने रुग्णालयाच्या मध्यभागी असलेल्या शेडला पडदा बसविल्यास बेडसाठी जागा उपलब्ध होऊ शकते, असा विचार पुढे आला. या संदर्भात उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार उमेश पाटील यांनी केलेल्या विनंतीस प्रतिसाद देत प्रवीण कोकाटे यांनी स्वखर्चातून 25 हजाराचे ग्रीन नेट (पडदा) बसविण्याचे काम करून दिले. त्यामुळे सुमारे 30 बेड वाढण्यास मदत होणार आहे. याचा मोठा फायदा नगर तालुक्‍यातील रुग्णांना होणार आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख