कोरोना पाहतोय सत्वपरीक्षा ! दहावीतील मुलीवर कुटुंबाची जबाबदारी - Corona is watching Satvapariksha! Family responsibility on the tenth grader | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना पाहतोय सत्वपरीक्षा ! दहावीतील मुलीवर कुटुंबाची जबाबदारी

विलास कुलकर्णी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

दोन चुलत्यांचे किडन्या निकामी झाल्याने निधन झाले. त्यांना आजी व आजोबा यांच्या एकेक किडन्या दिल्या होत्या. त्यामुळे तेही आधू झालेत. वडिलांच्या दोन्ही किडन्या निकामी आहेत. अकरा वर्षांपासून त्यांना रक्तशुद्धीकरण सुरू आहे.

राहुरी : गरीब शेतकरी कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी. वडिलांच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी झटत आहे. त्यांना आठवड्यातून दोनदा रक्तशुद्धीकरण (डायलेसिस) करावे लागते. त्यासाठी नगरला जावे लागते. कोरोनामुळे एसटी, रेल्वे बंद झाल्या. तिने वडिलांना तीन महिने दुचाकीवर नगरला नेले. दुर्दैवाचा फेरा वाढला. वडील कोरोनाग्रस्त आढळले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरातील परिस्थिती बिकट आहे. तिचा संघर्ष सुरू आहे. त्यासाठी गरज आहे, समाजाच्या मदतीची.

रेणुका राहुल डोंगरे (रा. केंदळ बु., ता. राहुरी) असे संघर्ष कन्येचे नाव आहे. ती दहावीला गेली आहे. घरात वृद्ध आजी- आजोबा, आई, एक भाऊ मतीमंद. तो शिर्डी येथे मूकबधिर विद्यालयात नववीत आहे. एक भाऊ तिच्याच शाळेत पाचवीत शिकतोय. अवघी दोन एकर शेती. त्यावरच उदरनिर्वाह चालतो. दोन गाया. त्यांच्या दुधाचा पगार वडिलांच्या दवाखान्यावर खर्च होतो.

तिचे वडील राहुल त्रिंबक डोंगरे (वय ४०) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात. अकरा वर्षांपासून त्यांना आठवड्यातून दोनदा रक्तशुद्धीकरण (डायलेसिस) करावे लागते. तिच्या दोन चुलत्यांना असाच आजार होता. आजी-आजोबांनी त्यांना आपल्या एकेक किडन्या दिल्या. परंतु, शस्त्रक्रियेनंतर दोन्ही चुलत्यांचे निधन झाले. त्यामुळे वडिलांची किडनी प्रत्यारोपण करण्याची तयारी नाही. तिच्या वडिलांना रक्तशुद्धीकरणासाठी नगर येथे आनंदऋषीजी रुग्णालयात न्यावे लागते. दहा वर्ष आजोबा त्यांना दुचाकीवरून, राहुरीला. तेथून एसटीने नगरला न्यायचे. आजोबांना प्रवास सहन होईना. त्यांची जबाबदारी रेणुकाने घेतली. 

दुर्दैवाने एक वर्षापूर्वी दुचाकीची चोरी झाली. महिन्याला दहा-बारा हजार रुपये दवाखाना खर्च. त्यात दुचाकी चोरी. बिकट परिस्थितीत भर पडली. रेणुकाने पैसे वाचविण्यासाठी वडिलांचा रेल्वेने प्रवास सुरु केला. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. रेल्वे, एसटी बंद झाली. तिचा संघर्ष वाढला. जुनी दुचाकी खरेदी केली. त्यावर तीन महिने वडिलांना नगरला नेले. सात दिवसांपूर्वी शुक्रवारी (ता. २८) तिचे वडिल कोरोनाग्रस्त आढळले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या संघर्षाला आर्थिक मदतीची जोड हवी आहे. कमलाकर कोते (शिर्डी) यांनी दहा हजारांची मदत केली. दानशूर व्यक्तींनी रेणुकाला मदत करण्याची गरज आहे.

चुलते, वडिलांच्याही किडण्या निकामी

दोन चुलत्यांचे किडन्या निकामी झाल्याने निधन झाले. त्यांना आजी व आजोबा यांच्या एकेक किडन्या दिल्या होत्या. त्यामुळे तेही आधू झालेत. वडिलांच्या दोन्ही किडन्या निकामी आहेत. अकरा वर्षांपासून त्यांना रक्तशुद्धीकरण सुरू आहे. या खर्चामुळे घरातील आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यात, वडिल कोरोनाग्रस्त आढळले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संकटांना घाबरत नाही. परंतु, आर्थिक मदतीची गरज आहे, असे मत रेणुका डोंगरे व्यक्त करते.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख