This Corona Warrior has not had a salary since February | Sarkarnama

या कोरोना वाॅरिअरचे फेब्रुवारीपासून पगारच नाहीत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 6 मे 2020

जिल्ह्यात 1318 ग्रामपंचायती असून, त्यांत 2754 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपासून पगार मिळालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह आता सर्वच विभाग काम करीत आहेत.

नगर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींतील सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार रखडले आहेत. हे सर्व कर्मचारी उसनवारी करून चरितार्थ चालवीत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहेत. स्वतःच्या जिवावर उदार होऊन गावासाठी ते कोरोना वाॅरिअर ठरत आहेत. मात्र पगाराअभावी उपाशीच राहत आहेत.
 
जिल्ह्यात 1318 ग्रामपंचायती असून, त्यांत 2754 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपासून पगार मिळालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह आता सर्वच विभाग काम करीत आहेत. त्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. गावात उसनवारी करून ते कुटुंब चालवीत आहेत. याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या.
जिल्हा परिषद प्रशासनाने पगारासाठी सर्व बाबींची पूर्तता करून ती राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाकडे पाठविली. त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर पगार वर्ग केले जातात; मात्र त्यांना अडचणी आल्याने कर्मचाऱ्यांना पगारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

ग्रामीण भागाची मदार 
ग्रामीण भागात गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून हे कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सूचविल्याप्रमाणे आपली भूमिका बजावत आहेत. मात्र त्यांना पगार मिळत ऩसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणच्या सरपंचांनी त्यांना थोडाफार शिदा दावून त्यांचे कुटुंब चालविण्याचा प्रयत्न केला.

कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने मिळावेत
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता ग्रामपंचायत पुरविते. शासनाकडून त्यांचे पगार थेट त्यांच्या खात्यावर वर्ग होत असतात. फेब्रुवारीपासून त्यांचे पगार जमा झालेले नाहीत. या कर्मचाऱ्यांना आम्ही प्रत्येकी एक हजार प्रोत्साहनपर दिले. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गावातील सुमारे 90 कुटुंबांना किरोणा भरून दिला. या कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळवून दिला आहे. तथापि, शासनाने या कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने जमा करण्याची गरज आहे. 
- मच्छिंद्र कराळे, सरपंच, आगडगाव 
 

हेही वाचा..

अंगणवाड्यांतील बालकांना पोषणआहाराचे वाटप पूर्ण 

कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने अंगणवाड्या बंद ठेवल्या आहेत. या अंगणवाड्यांतील सुमारे सव्वा लाख बालकांना पोषण आहाराचे वाटप घरपोच करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्याची माहिती सभापती मीरा शेटे यांनी दिली. 
कोरोनामुळे शाळा-महाविद्यालयांसह अंगणवाड्यांनाही सुटी दिली. मात्र, या काळातील पोषणआहाराचे धान्य विद्यार्थ्यांना घरपोच देण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील 5555 अंगणवाड्यांतील तीन ते सहा वर्षे वयोगटातील सुमारे एक लाख 23 हजार 161 विद्यार्थ्यांना पोषणआहाराच्या धान्याचे वाटप घरपोच केले आहे. त्याबरोबरच सहा महिने ते तीन वर्षे वयोगटांतील एक लाख 37 हजार 105 सर्वसाधारण बालके, सहा वर्षे वयोगटातील 3817 बालके, 54 हजार 45 गर्भवती व स्तनदा माता, तसेच 554 शाळाबाह्य, 11 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली, अशा एकूण एक लाख 98 हजार 164 जणांना पोषणआहाराचे वाटप करण्यात आले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी हे काम केले. त्यासाठी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष नियोजन केले, असे शेटे यांनी सांगितले

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख