जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरण - Corona vaccination in the district from today | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरण

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 जानेवारी 2021

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली असून, राज्यासाठी 9 लाख 63 हजार डोस मिळाले आहेत.

नगर : कोरोनामुळे गेल्या 10 महिन्यांपासून जनजीवन ठप्प झाले होते. कोरोनावरील लसीची प्रतीक्षा अखेर संपली असून, शनिवारपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरवात होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. 

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली असून, राज्यासाठी 9 लाख 63 हजार डोस मिळाले आहेत. राज्य कुटुंब कल्याण केंद्राच्या पुणे येथील कार्यालयामार्फत जिल्ह्याला 39 हजार 290 डोस मिळाले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुणे येथून लस आणली. जिल्हा परिषदेतील शीतसाखळी उपकरणात ती ठेवली आहे. सर्व तालुक्‍यांच्या मागणीनुसार या लसींचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 11 केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. 

जिल्हा रुग्णालय, कर्जत व पाथर्डी येथील जिल्हा उपरुग्णालय, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, अकोले व शेवगाव ग्रामीण रुग्णालयांसह नगर महापालिका हद्दीतील जिजामाता, नागापूर, केडगाव, तोफखाना, केडगाव आरोग्य केंद्रांत लसीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

 

हेही वाचा..

नगर जिल्ह्यामध्येही "बर्ड फ्लू'चा प्रवेश 

नगर, ता. 16 ः राज्यातील अनेक भागांत "बर्ड फ्लू'ने थैमान घातलेले असताना, नगर जिल्ह्यातही आता या संसर्गाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. 

मिडसांगवी (ता. पाथर्डी) येथे 52 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्याच दिवशी श्रीगोंद्यात कबुतर, तर भानगाव (ता. श्रीगोंदे) येथे कावळा मृत आढळून आला. नंतर जामखेडला कावळा व नगरमध्ये साळुंकी मृतावस्थेत आढळून आली होती. या सर्व पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यात मिडसांगवी येथील कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, उर्वरित ठिकाणच्या पक्ष्यांपैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातही "बर्ड फ्लू'ने शिरकाव केल्याचे स्पष्ट होत आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख