Corona is under control in the city, but if ignored, a situation like Mumbai is possible | Sarkarnama

कोरोना नियंत्रणात, पण दुर्लक्ष झाल्यास नगरची स्थिती पुण्यासारखी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 जून 2020

मुंबई- पुण्यामध्ये आज परिस्थिती अत्यंत भयंकर आहे, त्यामुळे आता आपले नियंत्रण कडकपणे करण्याची आवश्यकता आहे,

नगर : ``जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रित आहे, पण तरीही येथील प्रशासकीय व वैदयकीय अधिकाऱ्यांनी वेळीच सावध होऊन पूर्णपणे खबरदारी घेण्याची गरज आहे, अन्यथा येथे सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नगरमध्ये करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारांटाईनची स्थिती योग्य पध्दतीने हाताळावी लागेल,`` असे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केले. 

विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीबाबत कृषी व वैदयकीय विभागाचे अधिकारी, तसेच पोलिस यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी कोरोनाची स्थितीचा आढावा घेण्यात आला. खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अरुण मुंडे, नगर शहर अध्यक्ष भैय्या गांधी तसेच अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले, की आजच्या बैठकीत आरोग्य व्यवस्थेची माहिती व आढावा घेतला. यासाठी सुरु करण्यात आलेल्या उपाययोजना यंत्रणा पुरेशा आहेत का, या संदर्भात सुद्धा तपशीलवार माहिती घेण्यात आली. त्यामुळे आज तरी या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, असे चित्र आहे, म्हणून आपण अधिकाऱ्यांना सावध केले व त्यांना सांगितले की, मुंबई- पुण्यामध्ये आज परिस्थिती अत्यंत भयंकर आहे, त्यामुळे आता आपले नियंत्रण कडकपणे करण्याची आवश्यकता आहे, व या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.

दरेकर म्हणाले, की शेवगावला एका मंगल कार्यालयात जे रुग्ण क्वारांटाईन केले होते, त्यामध्ये दोघांना कोरोना झाला. त्यामुळे आम्ही मागणी केली की ज्या ठिकाणी संस्थात्मक पध्दतीने कोरोना रुग्ण आहेत व तेथे रुग्ण पॉझिटव्ह आढळला, तर त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्वांची तपासणी करा. कारण तेथील दोन ग्रुपमध्ये कोरोना पॉझिटीव्ह असतील, तर त्या ठिकाणी बाकीचे लोक प्रार्दुभावित होऊ शकतात. याबाबतची योग्य अमंलबाजवणी करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली. 

शेतकऱ्यांना खते बांधावर मिळावेत 

शेतकऱ्यांना देण्यात येणारी बी-बियाणे बांधावर वेळेत गेली आहेत का, तसेच शेतकऱ्यांसाठी खतांची उपलब्धता काय आहे, आदी गोष्टींची माहिती घेतली. त्याच बरोबर कापूस,हरभरा, मका, तूर आदींची खरेदी गतीने होत नाही, अशी येथील समस्या आहे, त्यामुळे येथील सीसीआयचे सेंटर व फेडरेशनच्या माध्यमातून होणाऱ्या खरेदीसाठी तात्काळ अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून १५ तारखेपूर्वी शंभर टक्के खरेदी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मिसाबंदी कायद्यामध्ये जे लोक होते, त्यांच्या मानधनाचा विषय प्रलंबित आहे, याबाबत निर्णय होऊनही त्याची अंमलबाजवणी होत नाही, तरीही हा प्रश्न लवकर सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहितीही दरेकर यांनी या वेळी दिली.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख