नगरमध्ये कोरोना 1 हजारांच्या उंबरठ्यावर,शहरावर संपूर्ण लाॅकडाऊनचे सावट - Corona in town on the threshold of 1 thousand, expecting a complete lockdown | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये कोरोना 1 हजारांच्या उंबरठ्यावर,शहरावर संपूर्ण लाॅकडाऊनचे सावट

मुरलीधर कराळे
शनिवार, 11 जुलै 2020

जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत 842 रुग्ण झाले. गेल्या काही दिवसांपासून रोज 50 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना 1 हजारांच्या उंबरठ्यावर आला असताना प्रशासनाकडून मात्र केवळ नियमित उपाययोजना होत आहेत.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत 842 रुग्ण झाले. गेल्या काही दिवसांपासून रोज 50 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना 1 हजारांच्या उंबरठ्यावर आला असताना प्रशासनाकडून मात्र नियमित उपाययोजना होत आहेत. त्यात बदल करून कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण लाॅकडाऊनसारख्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर नगरमध्ये केवळ मुकुंदनगरमध्ये रुग्ण होते. तेथील रुग्ण कमी होण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करून संपूर्ण लाॅकडाऊन केले. हा परिसर हाॅट स्पाॅट करून कोरोनाला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. जामखेडमध्येही त्याची पुनरावृत्ती झाली. जामखेडमध्ये प्रारंभी कोरोनाने राैद्ररुप धारण केले होते. त्यामुळे जामखेडच्या हाॅट स्पाॅटकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. तेथील तहसीलदार, लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाला पूर्णपणे पिटाळून लावणे शक्य झाले. जामखेड पॅटर्न राज्यभर गाजला.

संगमनेरला मात्र हा पॅटर्न लागू झालाच नाही. प्रशासनाने अनेक प्रयत्न करूनही संगमनेर तालुक्यातील रुग्ण कमी होत नाहीत. नेमक्या अडचणी सांगताना तेथील अधिकारी दोष नागरिकांना देतात. नागरिक सहकार्य करीत नाहीत. रस्त्यावर येतात. कितीही कारवाई केली, तरी त्याला जुमानत नाहीत, अशा तक्रारी अधिकारी करतात. पदाधिकारीही कठोर भुमिका घेत नाहीत. त्यामुळे संगमनेरमध्ये कोरोनाचा वाढता उपद्रव सुरूच आहे.

संगमनेर व जामखेड तालु्क्यानंतर आता कोरोनाने नगर शहरवासियांना गाठले आहे. नगर शहरात घुसलेला कोरोना आता बाहेर पडण्याचे नाव घेत नाही. सारसनगरनंतर माळीवाडा, नालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. ते कमी होते न होते तोच तोफखाना, सिद्धार्थनगर, गवळीवाडा हा परिसर गाठला. आता तेथील रुग्ण कमी होत नाहीत. रोज आकडा वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाचीही डोकेदुखी झाली आहे.

नगर जिल्ह्यात काल दिवसभरात 48 रुग्ण आढळून आले. नगर शहरातील पद्मानगर, टीव्हीसेंटर, फकिरवाडा, पाइपलाइन रोड, भिंगार आदी परिसरात काल रुग्ण आढळले. नगर शहरातील आता नवीन भागातही रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. आता नगर शहर केव्हा कोरोनामुक्त होणार, अशीच अपेक्षा नगरकरांना लागली आहे.

आता हवे संपूर्ण लाॅकडाऊन

औरंगाबाद, पुण्याच्या धर्तीवर नगर शहरात आता किमान 10 दिवसांचे संपूर्ण लाॅकडाऊन हवे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. एकदा रुग्ण कमी झाले, की लवकर वाढणार नाहीत, अशी आशा नगरकरांना आहे. कारण रोज लोक बाहेर पडण्याचे थांबत नाहीत. भाजीपाला, किराणा दुकानांतील गर्दी कमी होताना दिसत नाही. त्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे. रोजच 50 पर्यंत रुग्ण आढळून आल्यास येत्या तीन-चार दिवसांत नगर जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा 1 हजारांवर जाईल, अशी भिती व्यक्त होत आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख