नगर झेडपीतील अधिकारी कोरोनाचा बळी, कामकाज ठप्प - Corona took the victim of the officer in the city ZP, the work came to a standstill | Politics Marathi News - Sarkarnama

नगर झेडपीतील अधिकारी कोरोनाचा बळी, कामकाज ठप्प

मुरलीधर कराळे
मंगळवार, 28 जुलै 2020

संबंधित अधिकारी (वय 50) कोरोना बाधित होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पत्नीही कोरोनाबाधित झाल्या आहेत.  संबंधित अधिकाऱ्याला मधुमेहाचाही त्रास होता. एका कोविड सेंटरमध्ये त्यांचे आज पहाटे निधन झाले.

नगर : जिल्हा परषदेतील एका अधिकाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज (मंगळवार) सकाळी त्यांना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण करून आजच्या दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

संबंधित अधिकारी (वय 50) कोरोना बाधित होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पत्नीही कोरोनाबाधित झाल्या आहेत.  संबंधित अधिकाऱ्याला मधुमेहाचाही त्रास होता. एका कोविड सेंटरमध्ये त्यांचे आज पहाटे निधन झाले. ही माहिती जिल्हा परिषदेमध्ये धडकताच कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आज कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सध्याच्या उपाययोजना अपुऱ्या

जिल्हा परिषदेत सध्या केवळ थर्मल स्कॅनिंग व सॅनिटायझरचा वापर होतो. प्रत्यक्षात बाहेरून येणाऱ्यांना लगाम असायला हवा. तसेच रोज कार्यालयात आवश्यक ती फवारणी करण्याची गरज कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. अपुऱ्या सुविधा असल्याने कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांची झाली आहे. प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

सोमवारपर्यंत कामकाज बंद ठेवण्याची मागणी

कोरोना रुग्णामुळे एका अधिकाऱ्याचा बळी गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज सोमवारपर्यंत बंद ठेवावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनीही मागणी केली आहे. कामकाज सुरू असताना जिल्हा परिषद प्रशासन विशेष काळजी घेत नाही. त्यामुळे कोरोना वाढत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांतून होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, रोज तिनशे पेक्षाही जास्त रुग्णांची भर पडत आहे. प्रत्येक तालुक्यात रुग्णसंख्या वाढली आहे. जल्हा परिषदेत जिल्हाभरातून लोक येतात. ते ज्या भागातून आले, तेथील माहिती घेतली जात नाही, की कोणालाही अटकाव केला जात नाही. त्यामुळे कोविडबाबतीत जिल्हा परिषदेत सर्व काही अलबेल आहे, असे नाही. याबाबत कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख