कोरोना टेस्टमध्ये घोळच घोळ ! एकाच व्यक्तीचे सहा तासात दोन वेगळे अहवाल - In the Corona Test! Two separate reports from the same person in six hours | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना टेस्टमध्ये घोळच घोळ ! एकाच व्यक्तीचे सहा तासात दोन वेगळे अहवाल

संजय आ. काटे
शुक्रवार, 17 जुलै 2020

सरकारी यंत्रणेचा अहवाल येण्यास उशिर लागत असल्याने खासगी यंत्रणेत पुन्हा रात्री दहा वाजता स्त्राव घेतला. खासगीतील तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि काल रात्रीच सरकारी रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आणि एकच गोंधळ झाला.

श्रीगोंदे : १३ जुलैला घोगरगाव (ता. श्रीगोंदे) येथील एका व्यक्तीचा दुपारी चार वाजता सरकारी यंत्रणेने घशाचा स्त्राव घेतला. तो व्यक्ती गंभीर आजारी असल्याने त्याला शस्त्रक्रिया करायची होती. सरकारी यंत्रणेचा अहवाल येण्यास उशिर लागत असल्याने खासगी यंत्रणेत पुन्हा रात्री दहा वाजता स्त्राव घेतला. खासगीतील तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि गुरुवारी त्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया झाली. मात्र काल रात्रीच सरकारी रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आणि एकच गोंधळ झाला. घोगरगाव सील करण्याची प्रक्रिया सुरु आहे, मात्र त्या व्यक्तीचा खरा रिपोर्ट कोणता यावरुन खल सुरु होवू शकतो.

घोगरगाव येथील  ७२ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचा सरकारी अहवाल तीन दिवसांनी येथील आरोग्य विभागाला प्राप्त झाला. या व्यक्तीचा स्त्राव नगर येथे १३ जुलै रोजी घेण्यात आला होता. मात्र ती व्यक्ती एका आजाराशी झुंजत असल्याने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यातच सरकारी यंत्रणेचा अहवाल येण्यास उशिर लागणार, हे गृहित धरुन शहराजवळील एका अद्यावायत रुग्णालयातील लॅबमध्ये (कोरोना टेस्टसाठी सरकारमान्य) त्या व्यक्तीची टेस्ट झाली. दुसऱ्या अहवाल निगेटिव्ह आला आणि काल त्या व्यक्तीची शस्त्रक्रिया झाली. मात्र रात्री सरकारी अहवाल आला आणि तो व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे समजले. त्यामुळे यंत्रणेने लगेच घोगरगाव सील करण्याची प्रक्रिया सुरु केली. ग्रामपंचायतीचे तसे पत्र सरपंचांचे लगेच काढून सोशल मिडीयावर व्हायरल झाले.

मात्र खरा गोंधळ तर पुढे झाला. ती व्यक्ती पाॅझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह असल्याचा खासगीचा रिपोर्ट घरातील लोकांनी लगेच पाठविला. त्यामुळे सहा तासांच्या अंतराने केलेल्या दोन वेगळ्या ठिकाणच्या टेस्ट वेगळ्या कशा येवू शकतात, यावरुन गोंधळ सुरु झाला. मात्र तरीही घोगरगाव सील करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरु आहे.

नेमका कोणता अहवाल खरा ?

खासगी म्हणते, तो व्यक्ती निगेटिव्ह, तर सरकारी यंत्रणेचे तो पाॅझिटिव्ह ठरविला आहे. सहा तासांचे अंतर असले, तरी उशिराची टेस्ट सरकारी आहे. शिवाय आता त्या व्यक्तीची शस्त्रक्रियाही झाली आहे. त्यामुळे गोंधळ स्वाभाविक आहे.

अहवाल पाॅझिटिव्ह, खबरदारीच्या सूचना : डाॅ. खामकर

खासगी ठिकाणचा त्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे समजले. मात्र त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. त्याबद्दल वरिष्ठांना कल्पना दिली आहे. सरकारी यंत्रणेचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह असून, त्यानुसार पुढची खबरदारी घेण्याच्या सूचना वरिष्ठांच्या आहेत, असे श्रीगोंदे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन खामकर यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख