सर्व आमदारांच्या कोरोना चाचणीचे आदेश ! आमदार मोनिका राजळे पाॅझिटिव्ह - Corona test orders for all MLAs! MLA Monica Rajale positive | Politics Marathi News - Sarkarnama

सर्व आमदारांच्या कोरोना चाचणीचे आदेश ! आमदार मोनिका राजळे पाॅझिटिव्ह

राजेंद्र सावंत
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

नगर येथील राजळे ह्या आपल्या निवासस्थानी उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात असलेल्या त्यांच्या गाडीचे चालक व स्वीय सहायक यांची सुद्धा कोरोनाची टेस्ट घेण्यात आली होती .मात्र ती निगेटिव्ह आली आहे.

पाथर्डी : शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. शुक्रवारी पाथर्डी येथील श्रीतिलोक जैन विद्यालयात राजळे यांच्या घशातील स्त्राव घेवुन चाचणी करण्यात आली. शनिवारी त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

विधानसभा अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सर्व आमदारांनी कोरोनाची टेस्ट करून घेण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी ४ सप्टेंबर २०२० रोजी मोनिका राजळे यांचा स्त्राव पाथर्डी येथील करोना सेंटरमध्ये तपासणीसाठी घेण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी हा अहवाल आला असून, त्या अहवालानुसार त्या करोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले. हा अहवाल आला, त्या वेळी राजळे या आपल्या पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील घरीच होत्या. अहवाल आल्यानंतर राजळे तातडीने नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांना कोणताही त्रास जाणवत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना आपल्या घरीच राहून उपचार घेण्यास सांगितले.  

नगर येथील राजळे ह्या आपल्या निवासस्थानी उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात असलेल्या त्यांच्या गाडीचे चालक व स्वीय सहायक यांची सुद्धा कोरोनाची टेस्ट घेण्यात आली होती .मात्र ती निगेटिव्ह आली आहे. या पूर्वी मोनिका राजळे या एका कोरोना बाधित नातेवाईक रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून १२ दिवस विलगीकरण कक्षात राहणे पसंद केले होते. मात्र आज त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाल्याने मुंबई  येथे होणाऱ्या अधिवेशनात त्या सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख