मानधनात वाढ केली तरच कोरोना सर्वेक्षण ! आशा कर्मचाऱ्यांची भूमिका - Corona survey only if proper honorarium is paid! The role of Asha employees | Politics Marathi News - Sarkarnama

मानधनात वाढ केली तरच कोरोना सर्वेक्षण ! आशा कर्मचाऱ्यांची भूमिका

शांताराम काळे
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

आपल्या गावात, वॉर्डात, विभागात कोरोना रुग्ण किंवा संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे व विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची तपासणी करणे, ही अत्यंत जोखमीची कामे आशा कर्मचारी व आशा गट प्रवर्तकांना करावी लागत आहेत.

अकोले : आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांना रास्त मानधन द्या, अन्यथा कोरोना सर्वेक्षण इतर कुणाही कर्मचाऱ्यांकडून करून घ्या व आशा व गट प्रवर्तकांना यातून मुक्त करा, अशा आशयाचे निवेदन अकोले तालुक्यातील आशा व गट प्रवर्तकांनी आमदार डॉ. किरण लहमटे यांना दिले.

आपल्या गावात, वॉर्डात, विभागात कोरोना रुग्ण किंवा संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे व विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची तपासणी करणे, ही अत्यंत जोखमीची कामे आशा कर्मचारी व आशा गट प्रवर्तकांना करावी लागत आहेत. प्रसंगी आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या जीवाची पर्वा न करता आशा कर्मचारी व आशा गट प्रवर्तक आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या कामात मोठी जोखीम असल्याने काही आशा व त्यांच्या घरचे कोरोना संसर्गाने बाधित झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोरोना सर्वेचे हे अत्यंत जोखमीचे काम करत असताना या कामाचा आशांना महिन्याला केवळ १००० रुपये म्हणजेच दिवसाला केवळ ३३ रुपये मोबदला दिला जात आहे. आशा गट प्रवर्तकांना केवळ महिन्याला ५०० रुपये म्हणजेच दिवसाला केवळ १६ रुपये मोबदला दिला जातो आहे.

आशा व गट प्रवर्तकांच्या कष्टाची व जीविताची अशा प्रकारे चेष्टा केली जाते आहे. हा मोबदला सरकारने वाढवून द्यावा, यासाठी संघटना संघर्ष करत आहेच. मात्र तोवर गावे, शहरे व जागरूक लोकप्रतिनिधींनी आपले योगदान देऊन या प्रश्नांत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. 

आशा कर्मचाऱ्यांचे हे भीषण शोषण थांबवावे. नगर परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक विकास निधी तसेच सदस्यांचे व नागरिकांचे आर्थिक योगदान यातून कोरोना सर्वेसाठी सरकार देत असलेल्या या तुटपुंज्या मोबदल्याच्या जोडीला आशांना किमान ३००० व गट प्रवर्तकांना किमान ५००० रुपये प्रतिमहिना मानधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनाही आशा कर्मचाऱ्यांनी या आशयाची निवेदने दिली आहेत.

आशा व गट प्रवर्तकांच्या मागण्यांचा अत्यंत आस्थेने विचार करण्यासाठी व कोरोनाचा तालुक्यातील प्रसार रोखण्यासाठी सोमवारी (ता.21) अकोले तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते, आशा कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक घेऊ व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन या वेळी आ. डॉ. किरण लहमटे यांनी दिले.

या वेळी झालेल्या चर्चेत विनय सावंत, डॉ. अजित नवले यांनी तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अपेक्षित असलेले हस्तक्षेप व तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, निराधार व अपंग यांचे प्रश्न मांडले. भारती गायकवाड, संगीता साळवे व इतर आशा कर्मचारी यांनी निवेदन दिले. तालुक्याचे तहसीलदार मुकेश कांबळे तसेच अधिकारी या वेळी उपस्थित होते.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख