कोरोनाचा न्यायालयाला तडाखा पुन्हा दोन शिफ्टमध्ये कामकाज - Corona strikes court again in two shifts | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचा न्यायालयाला तडाखा पुन्हा दोन शिफ्टमध्ये कामकाज

उत्तम कुटे
गुरुवार, 25 मार्च 2021

लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी  नऊ महिने बंद असलेली राज्यातील न्यायालये नंतर टप्याटप्याने एक व दोन शिफ्टमध्ये सुरु झाली होती. १ जानेवारीपासून ती पूर्णवेळ झाली.

पिंपरीः कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचा फटका राज्यातील न्यायालयांना पुन्हा बसला आहे.पूर्णवेळ सुरु झालेले त्यांचे काम आजपासून पुन्हा पंधरा दिवस दोन पाळ्यांत सुरु झाले आहे.त्यामुळे रिमांड,जामीन यासारखे महत्वाचे कामकाज होण्याची शक्यता असल्याने प्रलंबित खटले तसेच राहण्याची भीती आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी  नऊ महिने बंद असलेली राज्यातील न्यायालये नंतर टप्याटप्याने एक व दोन शिफ्टमध्ये सुरु झाली होती. १ जानेवारीपासून ती पूर्णवेळ झाली. मात्र, पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट कायम राहिल्याने त्यासाठी १ महिना आणखी वाट पहावी लागली होती. मात्र, कोरोनाने पुन्हा उचल खाल्याने ती पावणेदोन महिन्यात पुन्हा दोन पाळ्यांत सुरु ठेवण्याची पाळी आली आहे.पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश नीरज धोटे यांनी त्याबाबतचा आदेश आज जारी केला.त्यानुसार पुणे,पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज आता सकाळी साडेदहा ते दुपारी एक आणि दुपारी दीड  ते चार या दोन पाळ्यांत सुरु झाले. पुणे आणि जळगाव जिल्ह्यासह औरंगाबाद,नांदेड,नाशिक,मुंबई,कल्याण  येथील न्यायालयेही दोन शिफ्टमध्येच चालणार आहे.तसा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने काल (ता.२४) काढला आहे.

दरम्यान, कोरोनामुळे गेल्यावर्षी नऊ महिने बंद झालेल्या न्यायालयांमुळे वकिलांवर काहीशी उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे ती पूर्णवेळ सुरु करावीत,या मागणीसाठी  पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनने आंदोलनाचा इशारा जिल्हा न्यायाधीश व पालकमंत्री न्यायाधीश असलेले उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती यांना दिला होता.त्यानंतर यावर्षी जानेवारीत पिंपरी-चिंचवड,पुणे शहरासह जिल्ह्यातील कोर्टाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरु झाले. नंतर १ फेब्रुवारीपासून ते नियमित झाले होते.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख