नगर : लाॅकडाऊन उठविल्यामुळे आता कोरोनाला आवर घालण्याचे काम जनतेलाच करावे लागणार आहे. प्रशासकीय पातळीवर अनेक नियम असले, तरी आजपासून ते शिथिल होत आहेत. त्यामुळे सर्व दुकाने उघडी राहणार असून, बाजारपेठा फुलणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोनाचा हाहाकार अधिक उडण्याची भिती असून, आता जनतेलाच स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. नगर जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांचा 21 हजारांचा टप्पा पूर्ण झाला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 21 हजार 472 रुग्ण आढळले आहेत. काल नव्या ४२१ बाधितांची रुग्णसंख्येत भर पडली आहे. तसेच ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ८३.२५ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल रूग्ण संख्येत ४२१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ३०४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २०७, अँटीजेन चाचणीत ६५ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४९ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका ११२, संगमनेर ४, राहाता २, पाथर्डी १८, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर १, नेवासे १, पारनेर १, अकोले २१, राहुरी १७, कोपरगाव ३, जामखेड १२, कर्जत ३ आणि मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ६५ जण बाधित आढळून आले. यामध्ये, राहाता १ ,श्रीरामपुर ३, कॅंटोन्मेंट १०, नेवासा २१, पारनेर ४, अकोले ३, कोपरगाव ७ आणि कर्जत १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १४९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. बरे झालेली रुग्ण संख्या १७ हजार ८७६ असून, आतापर्यंत २९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आजपासून लाॅकडाऊन शिथिल झाल्यामुळे परजिल्ह्यात प्रवास करणे शक्य होणार आहे. आता प्रवासासाठी पासेसची गरज पडणार नाही. त्यामुळे प्रवासी वाहतूक वाढणार आहे. त्याचाच परिणाम कोरोना रुग्ण वाढण्यावर होऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, नागरिकांना स्वतःची काळजी घेत कोरोनावर मात करावी लागणार आहे. प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक राहणार आहे.

