Corona report of five persons in Sangamner is positive | Sarkarnama

संगमनेरमधील पाच जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 जून 2020

संगमनेरमध्ये रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. निमोण या गावातील एक रुग्णा बरा होण्याच्या आत दुसऱ्याला लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका तणावाखाली आला आहे.

नगर : जिल्ह्यात आज सकाळी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. संगमनेर येथील हे सर्व रुग्ण असून, इतर 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेरकरांच्या काळजीत भर पडली आहे.

आज सकाळी 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आता 186 झाली आहे. आज संगमनेर येथील पाच जणांना बाधा झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. या पाच पैकी तीन जण निमोण येथील एकाच कुटुंबातील आहेत. यात 14 वर्षीय मुलीचा समावेश आहे. 18 वर्षीय मुलगा व 36 वर्षीय महिलाचे त्यामध्ये समावेश आहे. संगमनेर शहरातील दाते मळा येथील 38 वर्षीय महिला व मोगलपुरा येथील 48 वर्षीय महिलेचा बाधित रुग्णांमध्ये समावेश आहे.

कोरोनातून बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये महानगरपालिका हद्दीदील 8 जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शेवगाव येथील चारजण, संगमनेर येथील तीन, पारनेर येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे. राहाता आणि शिर्डी येथील प्रत्येकी एक अशा 19 व्यक्तींना आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती नोडल अधिकारी डाॅ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

संगमनेरचा कोरोना हटेना

दरम्यान, संगमनेरमध्ये रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. निमोण या गावातील एक रुग्णा बरा होण्याच्या आत दुसऱ्याला लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका तणावाखाली आला आहे. बहुतेक ठिकाणचे सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे असले, तरी लोक एेकताना दिसत नाही. बाजारपेठेत लोकांची गर्दी होताना दिसत आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण रोज वाढत आहेत. असे असले, तरी प्रशासनाकडून बाजारपेठांमध्ये विशेष नियंत्रण नाही. त्यामुळे सर्व भाजीबाजारांत गर्दी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी दुकानदारांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. संगमनेरमध्ये रुग्ण वाढण्यास हेही एक कारण आहे. त्यामुळे रुग्ण सापडत असलेल्या ठिकाणच्या जवळील गावांमधील सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी होत आहे. यापूर्वी जामखेड येथे कोरोनाने धुमाकूळ घातला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे हा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. अशा पद्धतीने संगमनेरमध्येही विशेष मोहीम राबवून हा तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. तालुक्यातील नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आहेत. त्यांनी याकामी लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख