Corona reached the village of Revenue Minister Jorve, on the threshold of three hundred in the district | Sarkarnama

कोरोना पोहोचला महसुलमंत्र्यांच्या जोर्वे गावात, जिल्ह्यात रुग्ण तिनशेच्या उंबरठ्यावर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 जून 2020

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गाव असलेले जोर्वे येथे कोरोनाचा रुग्ण आढळला असून, त्याला लक्षणे दिसू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पाॅझिटिव्ह आला.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, एकूण 282 रुग्ण झाले आहेत. आज नव्या सहा रुग्णांची भर पडली आहे. आज वाढलेल्या रुग्णांत संगमनेर, पारनेर व नगर शहरातील सारसनगर येथील रुग्णांचा समावेश आहे. रोज वाढत असलेले रुग्ण शक्यतो बाहेर जिल्ह्यातून आलेले किंवा त्यांच्यामुळे बाधित आहेत. स्थानिक लोकोना बाधा होण्याचे प्रमाण कमी आहे.

संगमनेरमधील नाईकवाडापुरा या प्रतिबंधित क्षेत्रात आज 59 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. तसेच घुलेवाडी येथील 48 वर्षीय पुरुषाला कोरोना झाल्याचे आज स्पष्ट झाले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गाव असलेले जोर्वे येथे कोरोनाचा रुग्ण आढळला असून, त्याला लक्षणे दिसू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पाॅझिटिव्ह आला. संगमनेरमध्ये सध्या रोज रुग्ण सापडत आहेत. संगमनेर तालुक्यातील निमोण हे गाव तर कोरोनाचे भंडारच असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेथील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत नाही. तेथील काही व्यक्तींचा मृत्यूही झाला असल्याने हे गाव कोरोनाच्या दहशतीखाली आहे.

भाळवणीत एकाच कुटुंबातील दोन मुली बाधित

यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या पारनेर तालुक्यात दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. भाळवणी येथील एकाच कुटुंबातील दोन मुलींना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले.  यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाली आहे. यापूर्वीही या गावात रुग्ण आढळला आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने दोन मुलींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गावात प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, लोक काळजी घेत आहेत.

सारसनगर भाग पुन्हा बाधित

नगर शहरातील सारसनगर भागातील 58 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. तो मूळचा झारखंड येथील असून, तो कर्करागावरील उपचारासाठी मुंबई येथून प्रवास करून आला होता. त्यामुळे त्याची तपासणी केली असता तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. 

जिल्ह्यात आता 282 रुग्ण कोरोनाग्रस्त झाले असून, त्यापैकी 237 बरे होऊन घरी गेले असल्याचे जिल्हा रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांनी सांगितले. नगर शहरात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून काळजी घेतली जात असली, तरी भाजीबाजारात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे इतरांना कोरोनाची बाधा होण्याची भिती व्यक्त होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख