नगर जिल्ह्यातील एका आमदारांना कोरोना, शहरात आता `सातच्या आत घरात` - Corona reached out to one of the MLAs in the district, now in the city `at home within seven` | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यातील एका आमदारांना कोरोना, शहरात आता `सातच्या आत घरात`

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 जुलै 2020

रात्री उशिरा आलेल्या अहवालातील 10 रुग्ण पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये एका आमदारांचाही समावेश आहे. संबंधित आमदार जिल्ह्यातील एका मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत असून, ते नगरला राहण्यास आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नगर ः जिल्ह्यातील एका मतदारसंघातील आमदारांनाच आता कोरोनाने गाठले आहे. ते नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल रात्री त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्याशी बैठक झालेल्या अधिकाऱ्यांचीही आज तपासणी होणार आहे. शहरातील कोरोनाला रोखण्यासाठी आता सायंकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. जिल्ह्यातही रोज रुग्ण वाढत आहे. काल दुपारपर्यंत जिल्ह्यात 24 रुग्ण वाढले होते. नंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालातील 10 रुग्ण पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये एका आमदारांचाही समावेश आहे. संबंधित आमदार जिल्ह्यातील एका मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत असून, ते नगरला राहण्यास आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, नगर शहरातील कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, शहरात विशेष पथके नियुक्त करून कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने शहरात सात पथके नियुक्त करण्यात आले आहेत. त्याच्या माध्यमातून शहरातील रस्त्यावरील नागरिकांची विचारपूस करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच तोंडाला मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी घोळका करणे, कामाशिवाय फिरणे अशा कारणामुळे थेट दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

शहरात 26 पथके कार्यरत

शहरातील एकविरा चाैक, ढवणवस्ती, भुतकरवाडी, कंवर महाराज पुतळा, नेप्तीनाका, तेलीखुंट, दिल्लीगेट, अप्पुहत्ती चाैक, राज चेंबर्स, सर्जेपुरा, पारिजात चाैक, प्रोफेसर काॅलणी चाैक, पाचपीर चावडी, शिवसेनेरी चाैक, केडगाव बायपास, इंपिरिअल चाैक, आयुर्वेद काॅलेज परिसर, हाॅटेल रंगोली, चाणक्य चाैक, कोठी चाैक, भिंगारमधील विजयलाईन चाैक, भगवानबाबा चाैक, मुठी चाैक, इरिगेशन मज्जिद, डिएसपी चाैक, भिंगार वेस आदी ठिकाणी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात एक प्रमुख अधिकारी व त्यांना सहकार्यासाठी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्या परिसरात नागरिकांना विनाकारण फिरू न देणे, तोंडाला मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे काम हे अधिकारी करणार आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी शहरात विशेष कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून लोकांनी विनाकारण फिरू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अशा व्यक्तींवर दंडात्मक व प्रसंगी पोलिस कारवाई करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख