Corona in the MIDC area, but no entry into companies | Sarkarnama

नगरच्या एमआयडीसीजवळ कोरोना ! कंपन्यांमध्ये मात्र `नो एन्ट्री`

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 12 जून 2020

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याने कंपन्यांमध्ये कोरोनाला `नो एन्ट्री` असेल.

नगर : आैद्योगिक वसाहतीच्या लगत असलेल्या गजानन काॅलनीत कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे हा परिसर हबकला आहे. कारण कंपन्यांच्या कामगारांमध्ये रुग्ण वाढू लागल्यास त्याचा परिणाम कंपन्यांवर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपन्यांचे व्यवस्थापन आधीच सजग आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याने कंपन्यांमध्ये कोरोनाला `नो एन्ट्री` असेल, असे ठाम मत मराठा चेंबर्स आॅफ काॅमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केलेे.

गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा सिलसिला सुरू असला, तरी येथील आैद्योगिक परिसरात मात्र कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. या परिसराला लागून असलेले नागापूर, नवनागापूर, बोल्हेगाव, बोल्हेगाव फाटा, गजानन काॅलनी आदी परिसर गजबजलेले आहेत. या परिसरात भाडेकरून म्हणून परप्रांतीय राहतात. बरेचशे परप्रांतीय आपापल्या गावी गेले असले, तरी अजूनही अनेकजण नोकरीच्या आशेने थांबलेले आहेत. अशाही स्थितीत या परिसरात यापूर्वी रुग्ण आढळून आला नव्हता. सरकारच्या आदेशानुसार कंपन्या सुरू झाल्या असल्या, तरी सर्वच कंपन्या सुरू न होता, ठराविक कंपन्यांची चाके फिरू लागली. तथापि, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केलेली आहे. याबाबत पारगावकर यांनी कंपन्यांनी केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

पारगावकर म्हणाले, ``आैद्योगिक वसाहतीतील कंपन्या स्वतः खूप काळजी घेतात. कर्मचाऱ्यांना कोणालाही कोरोनाची लागन होऊ नये, यासाठी शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. जाताना व येताना प्रत्येक कर्मचाऱ्यांचे रोज तापमान घेतले जाते. त्यासाठी प्रत्येक कंपन्यांनी साधनसामुग्री घेतलेली आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येकाला हात-पाय हॅण्डवाॅशने स्वच्छ करण्याचे नियोजन केलेले आहे. शिवाय सॅनिटायझरचा वापर केला जातो. मास्क वापरणे तर सर्वांनाच सक्तीचे असते. एकही व्यक्ती विनामास्कचा कोणत्याही कंपनीत सापडणार नाही, अशी व्यवस्था कंपनीधारकांनी केलेली आहे.``

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन

प्रत्येक कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियोजन केलेले आहे. आवश्यकतेनुसार मशिनरींची मांडणी बदललेली आहे. कॅन्टीमध्येही बसण्याच्या जागा बदलल्या असून, एका बाकावर एक किंवा मोठ्या बाकावर केवळ दोन व्यक्ती बसू शकतात. सहा फुटाचे अंतर कटाक्षाने पाळले जाते. प्रत्येक सिफ्टनंतर सोडियम हायपोक्लोराईड चा वापर केला जातो. आता कर्मचारी सुज्ञ झाले आहेत. प्रत्येकजण स्वतःची काळजी घेतो. सध्या आैद्योगिक वसाहतीतील 50 टक्के कंपन्या सुरू आहेत. त्यामुळे आपोआप सोशल डिस्टन्सींग होत आहे. तीन सिफ्टमध्ये काम चालू असल्याने कंपन्यांना काळजी घेणे अधिक सोयीचे होते, असे पारगावकर यांनी सांगितले.

परप्रांतीय गेले तरी अजून अडचण नाही

आैद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगार आहेत. कोरोनामुळे अनेक लोक त्यांच्या गावी गेले असले, तरी लाॅकडाऊन उठताच पुन्हा येतील. त्यांच्या गावीही रोजगार उपलब्ध नसल्याने हे लोक पुन्हा येतील, यात शंका नाही. सध्या अनेक कंपन्या बंद आहेत. तसेच कंपनीतील उत्पादित मालाला मागणीही नसल्याने हे कामगार गेल्याने विशेष अडचण नाही. नुकतेच आठ ते दहा हजार लोक श्रमिक रेल्वेने पुण्यात दाखलही झाले आहेत. त्यामुळे कंपन्यांमध्ये हे कामगार येवून कंपन्यांची चाके पूर्ववत सुरू होतील, अशी अपेक्षा पारगावकर यांनी व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख