श्रीरामपूर : श्रीरामपूरमधील काही पदाधिकारी बाधित निघूनही तालुक्यात कोरोनाबाबतचे नियम पाळले जात नाहीत. सामाजिक अंतराचा फज्जा उडाला असून, शहरात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
तालुक्याचे आमदार कोरोना पाॅझिटिव्ह होते. त्यांच्या पत्नीचे अहवालही पाॅझिटिव्ह आले होते. त्यांनी नागरिकांना आवाहन करून सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे सांगितले होते. तसेच इतर काही पदाधिकारीही कोरोना बाधित आढळले आहेत. श्रीरामपूरची कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असून, 200 पर्यंत गेली आहे. असे असताना अवैध धंदेही राजरोसपणे सुरू आहेत.
मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे याबाबत तालुक्यात काही गुन्हेही दाखल झाले आहेत. श्रीरामपूर शहरासह तालुक्यात व्यवसायिकांनी सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत दुकान खुले करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अवैध धंदेवाल्यांनी नियम पायदळी तुडविले आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वसामान्य नागरिक कामानिमित्त फिरत असताना मास्क न वापरल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
ग्रामीण भागातही कोरोना
दरम्यान, श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील इतर गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कामानिमित्त शहरात येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असून, तालुकापातळीवर कामानिमित्त आलेले लोक कोणतेही सोशल अंतर पाळताना दिसत नाही. कोरोना आढळलेल्या गावांमध्ये ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे. तालुक्यातील वडाळा महादेव, बेलापूर अशा मोठ्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

