नगर : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना त्यातून जिल्हा परिषद कसी सुटेल? आज एक कर्मचारी बाधित आढळल्याने जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आता अधिक कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये विविध कामानिमित्त जिल्हाभरातून लोक येतात. सध्या कोरोनाची बाधा सर्वच तालुक्यात झाली आहे. नगर शहर शहरात तर कहरच केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने खरबदारी घेतली होती. विविध ठिकाणी सॅनिटायझरचा वापर, कर्मचारीही काळजी घेत होते. येणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त अंतरावर ठेवून कर्मचारी बोलत होते. कामे रखडून पडू नये, अशी भूमिका अनेकदा व्यक्त होत होती. मात्र येणारे नागरिक काळजी घेतीलच असे नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक अनामिक भिती होती. आज मात्र रुग्ण सापडल्याने सर्वच कर्मचाऱ्यांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
सर्वांचीच व्हावी तपासणी
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच पदाधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घ्यावी, अशी अपेक्षा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे यांनी व्यक्त केली. शेटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्याशी चर्चा केली. कामानिमित्ताने अनेकजण जिल्ह्यातून जिल्हा परिषदेत येत आहे. कितीही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खरबदारी घेतली, तरी संपर्क येत आहे. तसेच पदाधिकाऱ्यांसह सदस्यही जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच नागरिकांमध्ये फिरत आहेत. त्यातच जिल्हा परिषदेत एक कोरोनाबाधीत येऊन गेलेला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी अपेक्षा शेटे यांनी व्यक्त केलेली आहे.
वर्क टू होम
जिल्हा परिषदेच्या काही विभागातील कर्मचाऱ्यांना खरबदारीचा उपाय म्हणून आज प्रशासनाने घरी पाठवून देऊन वर्क टू होम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कामावर जाण्यास आता कर्मचारीही टाळत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती शंभर टक्के न करता टप्प्याने कर्मचाऱ्यांना बोलवावे, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार कार्यालयात गर्दी होणार नाही, याबाबत खबरदारी घेतली जात आहे. असे असले, तरी सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही कपात करून काहींना वर्क टू होम करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे समजते.

