महसूलमंत्र्यांच्या संगमनेरमध्ये कोरोना वाढता वाढे - Corona grows in the confluence of revenue ministers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

महसूलमंत्र्यांच्या संगमनेरमध्ये कोरोना वाढता वाढे

आनंद गायकवाड
रविवार, 26 जुलै 2020

नगर जिल्ह्यात सध्या तीन हजार कोरोनारुग्णांची नोंद झाली. त्यापैकी एकट्या संगमनेर तालुक्यात 500 रुग्ण आहेत, हे विशेष.

संगमनेर : गेल्या चार महिन्यांपासून तालुक्यात कोरोनाची संख्या रोज वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काल दिवसभरात संगमनेर शहर व तालुक्यातील तब्बल 45 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला. असे असले, तरी याचे गांभिर्य नागरिकांच्या लक्षात येत नाही. तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने आता 500 चा टप्पा ओलांडला असून, ती संख्या 528 झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या या तालुक्यात कोरोनावर नियंत्रण करण्यात प्रशासनाला अपयश आल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

नगर जिल्ह्यात सध्या तीन हजार कोरोनारुग्णांची नोंद झाली. त्यापैकी एकट्या संगमनेर तालुक्यात 500 रुग्ण आहेत, हे विशेष.

काल सकाळी आलेल्या अहवालात शहरातील घोडेकरमळा, घासबाजार, पद्मनगर, इंदिरानगर, देवीगल्ली व बाजारपेठेसह तालुक्यातील कासारा दुमाला व वडगाव लांडगा येथून तब्बल अकरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसर हादरून गेला. रात्री उशिरा प्राप्त झालेल्या शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालात पुर्वीच्या बाधित प्रभागासह संगमनेर शहरातील काही भागात नव्याने कोरोनाचे संक्रमण झाल्याचे सिध्द झाले. यात शहरातील एका प्रचंड वर्दळीच्या राष्ट्रीय बँकेतील तिघांचे अहवालही पाॅझटिव्ह आल्याने शहराच्या बँकिंग क्षेत्रात पहिल्यांदाच खळबळ उडाली आहे. या बँकेतील 35 वर्षीय व 33 वर्षीय तसेच 27 वर्षीय महिला कर्मचाऱ्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच नव्याने तहसिल कार्यालय परिसर, गणेशनगर, खंडोबा गल्ली, जेधे कॉलनी, माळीवाडा, विद्यानगर, बाजारपेठ, जनतानगर, पद्मनगर, अशा 10 विविध ठिकाणांहून 25 रुग्णांची भर पडली आहे.

प्रशासनाचा सूचनांचा भडीमार

तालुक्यातील सुकेवाडीतील तीन पुरुषांसह गुंजाळवाडी, राजापूर, कोंची, पिंपळगाव देपा, शिबलापुर व कुरणमधून प्रत्येकी एक अशा नऊ रुग्णांची भर पडल्याने शनिवारी रात्री तालुक्याची कोविड बाधित रुग्णसंख्या 528 झाली आहे. असे असले, तरी नागरिकांनी आजही बाजारात गर्दी केलीच. यावर स्वयंशिस्तीचे पालन हाच एकमात्र उपाय असल्याने वारंवार व दिवसभर प्रशासकिय पातळीवर सुचनांचा भडीमार करुनही काही उपयोग होत नाही.

आता थोरातांनीच उपाययोजना करावी

दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा तालुका असलेल्या या भागात विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. राज्याचे नेतृत्त्व करीत असताना थोरात यांनी आपल्या तालुक्याकडे, मतदारसंघाकडे विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जामखेड तालुका लवकर कोरोनामुक्त झाला होता. आताही तेथे जनता कर्फ्यूसारख्या उपाययोजना सुरूच आहेत. अशाच पद्धतीने संगमनेरमध्ये उपाययोजना करून जनतेचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

re>

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख