कोरोना वाढतोय ! अनावश्यक कामांसाठी रात्री फिराल तर खिसा गरम ठेवा - Corona is growing! Keep your pockets warm if you travel at night for unnecessary work | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना वाढतोय ! अनावश्यक कामांसाठी रात्री फिराल तर खिसा गरम ठेवा

मुरलीधर कराळे
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

जिल्ह्यात आज १३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ७६९ इतकी झाली आहे.

नगर : राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवरही संसर्ग रोखण्यासाठी आता पुन्हा वेगाने पावले उचलली आहे. जिल्हावासीयांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क वापरावा, शारीरिक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा. रात्री १० ते पहाटे पाच या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी फिरणार्‍यांवर आता निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अनावश्यक कामांसाठी फिराल तर खिसा गरम ठेवावा लागणार आहे.

हेही वाचा... भाजपचे आता युवा वाॅरिअर्स

दरम्यान, जिल्ह्यात आज १३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८९९  इतकी झाली आहे.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात केली आहे.

हेही वाचा.. आमदारांच्या कुटुंबियांसाठीच जिल्हा बॅंक आहे का

मास्क न घालता फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी स्वताची तसेच स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, विनाकारण अनावश्यक रित्या घराबाहेर पडणे टाळावे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही यादृष्टीने सतर्क झाली असून, महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या प्रमुखांसोबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठक घेऊन यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत.

नागरिकांनी लग्न  व इतर सोहळ्यांसाठी असणारी निर्बधाची मर्यादा पाळावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

बाजारपेठांसह इतर गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश डॉ. भोसले यांनी दिले आहेत. त्यानंतर महानगरपालिका आणि इतर तालुक्याची ठिकाणे तसेच गावपातळीवरही विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

मंगल कार्यालये, लॉन्स चालक यांनाही परवानगीपेक्षा जास्त गर्दी झाली तर कारवाई बडगा उगारण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यासंदर्भात तालुकापातळीवरही टास्क फोर्स, विविध यंत्रणा, विविध विभाग, महामंडळे, शाळा-कॉलेजेस यांचे व्यवस्थापन आदींना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले आहेत.

दरम्यान, आज जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८१ आणि अँटीजेन चाचणीत १५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६, अकोले १, कर्जत २, कोपरगाव ३, नगर ग्रामीण १०, राहाता २, राहुरी १, संगमनेर १३, शेवगाव ४ आणि इतर जिल्हा १अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 72 हजार 769 झाली असून, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 899 झाली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 129 रुग्णांचा मत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 74 हजार 797 रुग्णसंख्या झाली आहे.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख