कोरोना उद्रेक, नगर जिल्ह्यात उच्चांकी 1680 रुग्ण, 13 बळी - Corona eruption, highest in Nagar district 1680 patients, 13 victims | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना उद्रेक, नगर जिल्ह्यात उच्चांकी 1680 रुग्ण, 13 बळी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत 677, खासगी प्रयोगशाळेत 514, अँटीजेन चाचणीत 489 रुग्ण आढळून आले आहेत.

नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून, आज दिवसभरात एक हजार 680 उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरातील सर्वाधिक 433 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. नगर शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना बेड शिल्लक राहिले नाहीत. आज दिवसभरात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत 677, खासगी प्रयोगशाळेत 514, अँटीजेन चाचणीत 489 रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणेः श्रीरामपूर 116, कोपरगाव 114, संगमनेर 105, कर्जत 101, राहुरी 92, नगर 74, पाथर्डी 63, अकोले 61, शेवगाव 61, पारनेर 60, नेवासा 55, जामखेड व श्रीगोंदे प्रत्येकी 37 रुग्ण आढळून आले आहेत. भिंगार 16, लष्कराच्या रुग्णालयात 14, बाहेरील जिल्ह्यातील 12 रुग्ण आढळून आले आहेत. उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या 6 हजार 714 झाली आहे. 
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 94 हजार 922 झाली आहे. कोरोनातून बरे होण्याच्या प्रमाण लक्षणीय घट होत आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.64 टक्के झाले आहे. दिवसभरात 1 हजार 338 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 86 हजार 990 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या एक हजार 218 झाली आहे. 

अंदाजपत्रकीय सभेत कोरोनावर चर्चा 

शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता महापालिकेच्या आजच्या ऑनलाइन अंदाजपत्रकीय सभेत दिसून आली. महापालिकेने कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांची झाडाझडतीच नगरसेवकांनी घेतली. 

कुमार वाकळे यांनी, चाचणीचे अहवाल वेळेत मिळत नसल्याबाबत चिंता व्यक्‍त केली. यावर आयुक्‍त शंकर गोरे यांनी, हे अहवाल वेळेत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यात येणार आहे. आगामी अडीच महिन्यांत दोन लाख नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी नव्याने कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना उपाययोजनेसाठी 5 कोटी 36 लाख रुपये राज्य शासनाच्या निधीतून दिले आहेत, असे आयुक्‍तांनी सांगितले. कुमार वाकळे व संपत बारस्कर यांनी कोरोनाबाबत उपाययोजनेसाठी वॉर्डनिहाय समित्या नियुक्‍त करण्याची मागणी केली. महापौरांनी ती मान्य केली. 

शहरात महापालिकेतर्फे तीन ठिकाणी सध्या कोविड सेंटर सुरू आहेत. आणखी दोन ठिकाणी सुरू करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने चालविली आहे. उद्यापासून महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयांतील कर्मचारीही कोरोनाविषयक कामांसाठी नियुक्‍त करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लसीकरण व स्वॅब संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने भोसले आखाड्यातील महापालिकेच्या जिजामाता आरोग्य केंद्रात अँटिजेन चाचणीची सोय करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी दिली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख