Corona effect! The family was evicted due to the rent | Sarkarnama

कोरोना इफेक्ट ! घरभाड्यासाठी मालकाने सामान जप्त करून कुटुंबाला हाकलले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 मे 2020

घरमालकाने घरातील सामान जप्त केले. आठवडाभरात दुसऱ्यांदा घराबाहेर काढले. पती-पत्नी व दोन लहान मुलांसह एक कुटुंब रस्त्यावर आले. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात कैफियत मांडली.

राहुरी : कोरोना आणि लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून हाताला काम नाही. घरभाड्याचे तीन हजार रुपये थकले. घरमालकाने घरातील सामान जप्त केले. आठवडाभरात दुसऱ्यांदा घराबाहेर काढले. पती-पत्नी व दोन लहान मुलांसह एक कुटुंब रस्त्यावर आले. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात कैफियत मांडली. पोलिसांनी घरमालकाची कानउघाडणी केली, तेव्हा घरमालकाने कुलूप उघडून भाडेकरूला पुन्हा घरात घेतले. 

बाबासाहेब बंडू निकम (रा. राहुरी) असे पीडित कुटुंबप्रमुखाचे नाव आहे. एक वर्षापासून ते पत्नी व दोन लहान मुलांसह राहुरी शहरातील पंढरी मंगल कार्यालयाजवळील एका इमारतीत भाडोत्री खोली घेऊन राहतात. पती-पत्नी मिळेल ती मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह करतात. दोन हजार रुपये प्रतिमहिना घरभाडे देतात. 

लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून हाताला काम नाही. त्यामुळे त्यांचे दोन महिन्यांचे चार हजार रुपये भाडे थकले. घरमालकाने तगादा सुरू केला, तेव्हा त्यांनी एक हजार रुपये दिले; परंतु उर्वरित तीन हजार रुपयांसाठी घरमालकाने मागील शनिवारी (ता. 16) घराला कुलूप ठोकले. निकम कुटुंबाला घराबाहेर काढले. निकम यांनी कुटुंबासह राहुरी पोलिस ठाण्यात न्याय मागितला. पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी खरात यांनी निकम यांच्यासोबत जाऊन घरमालकाला विनंती केली. तेव्हा घरमालकाने कुलूप उघडले. 

दरम्यान, घरमालकाने शनिवारी दुसऱ्यांदा निकम कुटुंबाला घराबाहेर काढले. घरातील सामान जप्त केले. "थकीत तीन हजार रुपये घरभाडे द्या. मग तुमचे सामान ताब्यात घ्या,' असे सुनावले. निकम यांनी कुटुंबासह पुन्हा पोलिस ठाण्यात कैफियत मांडली. पोलिस नाईक प्रवीण खंडागळे यांनी घरमालकाची कानउघाडणी केली, तेव्हा निकम कुटुंबासाठी पुन्हा घराचे कुलूप उघडण्यात आले. 

घरमालकांनी सहकार्य करावे

लाॅक डाऊनच्या काळात मजुरांना घराबाहेर काढू नये. भाडे थकणे, वीजबील थकणे, विविध कर थकल्यामुळे सर्वचजण त्रस्त आहेत. त्यामुळे घरमालकांनीही परिस्थिती ओळखून आपल्या भाडेकरुंना सहकार्य करावे. अशा प्रकारचे प्रकार घडल्यास तातडीने पोलिसांना कळविले पाहिजे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी केलेल्या अहवानानुसार एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार कोणीही कर्जाचा किंवा कशाचाही तगादा लावू नये. एकमेकांना सहकार्य करूनच कोरोनावर आपण मात करू शकतो. त्यामुळे घरमालकांनी सहकार्य करावे, असे मत सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख