माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह कुटुंबातील चार जणांना कोरोना - Corona to Chaighan in the family, including former MLA Anil Rathore | Politics Marathi News - Sarkarnama

माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह कुटुंबातील चार जणांना कोरोना

मुरलीधर कराळे
मंगळवार, 28 जुलै 2020

राठोड यांना फ्ल्यूसदृश लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी रविवारी स्वॅब दिले. त्यांचा अहवाल काल रात्री पाॅझिटिव्ह आला. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

नगर : शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचे कोरोनाविषयक तपासणीचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील चाैघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. 

राठोड यांना फ्ल्यूसदृश लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी रविवारी स्वॅब दिले. त्यांचा अहवाल काल रात्री पाॅझिटिव्ह आला. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही स्वॅब घेण्यात आले असून, त्यांची पत्नी, मुलगा, सून हेही पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. रात्रीच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राठोड यांच्या चाहत्यांनी राठोड यांना लवकर बरे होण्याबाबत प्रार्थना केली आहे. सोशल मीडियावर तसे संदेश व्हायरल होत आहेत. ``अनिल भैय्या, विक्रम भैय्या, तुम्ही सही सलामत यातून बाहेर पडणार आहोत आणि पहल्यापेक्षाही नव्या जोमाने कामाची सुरुवात करणार आहात. तुम्ही निःस्वार्थी भावनेने केलेल्या कामाची पावती तु्म्हाला मळणार आहे. काळजी करू नका. गोरगरीबांच्या सेवेचा आशिर्वाद तुमच्या पाठिशी आहे,`` अशी पोस्ट नितीन कोतकर यांनी फेसबुकवर टाकून त्यांना धीर दिला आहे.

दरम्यान, ``कोणीही घाबरू नका. नागरिकांनी आपापल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आम्ही लवकरच बरे होऊन नगरकरांच्या सेवेत पुन्हा येवू,`` अशी पोस्ट फेसबूकवर विक्रम राठोड यांनी टाकली आहे.

चितळेरोड परिसरात गर्दी सुरूच

शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या चितळेरोड परिसरात मागील काही दिवस पूर्णपणे बंद होते. आता मात्र गर्दीने हा रस्ता भरला आहे. याच रस्त्यावर राठोड यांचे शिवसेनेचे कार्यालय आहे. भाजीबाजार बंद केला असला, तरी इतर दुकाने या परिसरात सुरू आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भागाला पुन्हा सील करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सध्याही शहरातील अनेक भाग कोरोनामुळे सील करण्यात आला आहे. शहराजवळील उपनगरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असून, रोज आकडेवारी वाढताना दिसून येत आहे. सारसनगर, केडगाव आदी भागातील रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. तोफखाना, नालेगाव, बालिकाश्रम रोडवरील रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले, तरी तेथील नागरिक काळजी घेताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने कठोरपणे निर्णय घेवून नियमांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडावे, अशी मागणी होत आहे.

शहराबरोबरच शेजारील गावांमध्ये रुग्ण सापडू लागले आहेत. शहरातील माल खरेदीसाठी लोक येत असून, त्यातून त्यांना बाधा होताना दिसत आहे. नगर तालुक्यातील अनेक गावे सध्या बंद आहे. बुऱ्हाऩगर या मोठ्या गावातील व्यवहारही कोरोनामुळे ठप्प झालेले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख