कोरोनामुळे कारखान्यांच्या गोदामात निम्मी साखर पडून

260 लाख मेट्रिक टन देशातील साखरेचा खप गृहीत धरला, तरी जवळपास 150 लाख मेट्रिक टन साखरसाठा अतिरिक्त होण्याची भीती आहे.
sugar factory
sugar factory

शिर्डी : कोरोना व लॉकडाउनचा साखर उद्योगाला मोठा फटका बसला. साखरेचा खप निम्म्याने कमी झाला. आता मंजूर कोट्यातील निम्मी साखर गोदामात तशीच पडून आहे. बंदरावरील परप्रांतीय मजूर निघून गेले. कंटेनरमध्ये साखरपोती भरण्यासाठी मनुष्यबळ नाही. साखरेची निर्यात करणाऱ्या कारखान्यांसमोर आता ही नवीच अडचण निर्माण झाली आहे. त्यात क्रूड ऑइलचे दर घटल्याने भविष्यात इथेनॉल उत्पादन परवडेल का, याची चिंता साखर उद्योगाला सतावते आहे. 

घरगुती वापरासाठी 35 टक्के, तर मिठाई, शीतपेये व औषधनिर्मितीसाठी 65 टक्के साखर वापरली जाते. कारखाने व मिठाईउत्पादन बंद पडले. साखरेच्या खपात निम्म्याहून अधिक घट झाली. केंद्र सरकारने देशातील साखरविक्रीचा दरमहा कोटा 22 लाख मेट्रिक टनांवरून 18 लाख मेट्रिक टनांपर्यंत खाली आणला. 

यंदा देशात 115 लाख मेट्रिक टन साखरसाठा शिल्लक आहे. येत्या गळीत हंगामात त्यात आणखी 300 मेट्रिक टन साखरेची भर पडेल. 260 लाख मेट्रिक टन देशातील साखरेचा खप गृहीत धरला, तरी जवळपास 150 लाख मेट्रिक टन साखरसाठा अतिरिक्त होण्याची भीती आहे. त्यातच क्रूड तेलाचे भाव कमालीचे घसरल्याने आता साखर कारखान्याने उत्पादित केलेले इथेनॉल तेल कंपन्या निर्धारित भावाने विकत घेतील का, असा प्रश्‍न कारखानदारांना पडला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्र, गुजरात सीमेवरील साखर कारखाने व कार्यक्षेत्रात प्रामुख्याने परप्रांतीय मजूर काम करतात. ते घरी परतल्याने या कारखान्यांसमोर हा आणखी एक पेच निर्माण झाला आहे. 

लाॅकडाऊनचा फटका सहन होणार नाही : आमदार काळे

केंद्र सरकारने साखरेचे भाव स्थिर ठेवले. निर्यात अनुदान जाहीर केले. बफर स्टॉकला प्राधान्य दिले. मात्र, देशातील साखर उद्योगाला त्यापोटी तब्बल 3700 कोटींचे येणे आहे. आता लॉकडाउनमुळे नवे संकट निर्माण झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्राकडे साखर उद्योगासाठी पॅकेजची मागणी केली आहे. केंद्राने आधार दिला नाही, तर लॉकडाउनमुळे बसणारा फटका या उद्योगाला सहन होणार नाही, असे मत कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com