इंदोरीकरांनाच नव्हे, हिंदू धर्माला बदनाम करण्याचे षडयंत्र : शंकर गायकर - Conspiracy to defame Hindu Dharma, not just Indorikars: Shankar Gaikar | Politics Marathi News - Sarkarnama

इंदोरीकरांनाच नव्हे, हिंदू धर्माला बदनाम करण्याचे षडयंत्र : शंकर गायकर

शांताराम काळे
सोमवार, 27 जुलै 2020

आक्रमक हिंदुत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे नेते शंकर गायकर यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतल्यामुळं वेगळीच चर्चा रंगली असून, व या पुढील लढाई हिंदुत्ववादी संघटना विरुद्ध पुरोगामी अशी रंगण्याची चिन्हे आहेत.

अकोले : अकोले : निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) हे हिंदू धर्मातील उत्तम प्रबोधनकार आहेत. अनेकांचे उध्वस्त झालेले संसार त्यांच्या प्रबोधनामुळे सुरळीत झाले आहेत. त्यांना बदनाम करण्याच्या रुपाने काही पुरोगामी म्हणविणाऱ्या लोकांचे हिंदू धर्माला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अशा लोकांना जाब विचारल्याशिवाय बजरंगदल स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रिय मंत्री शंकर गायकर यांनी दिला.

अकोले येथे त्यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

गायकर म्हणाले, की इंदोरीकर महाराज गेली २५ वर्षे कीर्तनातून ते लोकांचे प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या प्रबोधनामध्ये हिंदू ग्रंथ पुराणाचा संदर्भ असतो. त्याच अनुषंगाने त्यांनी सम-विषम तारखेबद्दल आपले प्रबोधन केलेले आहे. त्यांचा त्यामागे समाजात कोणताही अपप्रचार करण्याचा हेतू नव्हता. त्यांचे सामाजिक कार्य सर्व राज्यात सर्वश्रुत आहे. हिंदू धर्माची वाढती लोकप्रियता ही हिंदू धर्म विरोधकांना खपत नाही, त्यामुळे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून समाजात हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या साधुसंतांना त्रास देण्याचे षड्यंत्र काही मंडळीनी चालवले आहे. अशा प्रवृत्तीचा बिमोड केल्याशिवाय बजरंगदल स्वस्थ बसणार नाही. पुरोगामी समजल्या जाणाऱ्यांमध्ये दम असेल, तर त्यांनी इतर धर्मातील अनिष्ठ रूढी व परंपरा याविरुद्ध कार्यवाही करण्याची हिम्मत दाखवावी किंवा हिंदू धर्माला बदनाम करण्याचे उद्योग त्वरित थांबवावे, अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय बजरंग दल स्वस्थ बसणार नाही, असा इशारा

कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करुन अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून इंदुरीकर महाराजांना ओळखलं जातं. अनोख्या व रोखठोक शैलीमुळे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी होत असते. इंदीरीकर महाराजांनी अपत्यांबाबत केलेल्या एका वयक्तव्यामुळे राज्यभर गदारोळ झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इंदोरीकर महाराजांनी या प्रकरणी खुलासाही केला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या मागणीवर पुरोगामी संघटना ठाम होत्या. अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यांना कोर्टाच्या वाऱ्याही कराव्या लागणार आहेत. या आधीही अनेक राजकीय नेत्यांनी व विविध सामाजिक संघटना व संप्रदायांनी इंदोरीकर महाराजांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, महाराज कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर संपूर्ण देशभर पसरलेल्या व आक्रमक हिंदुत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे नेते शंकर गायकर यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतल्यामुळं वेगळीच चर्चा रंगली असून, व या पुढील लढाई हिंदुत्ववादी संघटना विरुद्ध पुरोगामी अशी रंगण्याची चिन्हे आहेत.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख