नगर : लाॅकडाऊननंतर बंद ठेवण्यात आलेल्या टंकलेखन संस्था सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाची मान्यता मिळाली असून, अशा संस्थांनी कोविड नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे सुरू करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य टंकलेखन व लघुलेखन शासनमान्यता संस्थांच्या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी केले आहे.
कोविडमुळे लाॅकडाऊननंतर सर्व संस्था बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून इतर जिल्ह्यामध्ये सरकारच्या मान्यतेने अशा संस्था सुरू झाल्या आहेत. नगर जिल्ह्यातही संस्था सुरू ठेवण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी अहमदनगर जिल्हा टंकलेखन व लघुलेखन असोशिएशनच्यावतीने करण्यात आली होती. त्यावर उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी संघटनेला पत्र दिले असून, कोविडचे सर्व नियम पाळून संस्था सुरू करण्यास व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास मान्यता दिली असल्याचे म्हटले आहे.
आदेशाप्रमाणे टंकलेखन संस्थांची यादी जिल्हाप्रशासनाकडे पाठवायची आहे. सामाजिक अंतर पाळून संस्थांना विद्यार्थ्यांचा कमीतकमी संपर्क येईल, असे नियोजन करावे लागतील. प्रतिबंधित क्षेत्रात संस्था सुरू ठेवण्यास परवानगी दिली नसून, त्यांचे क्षेत्र पूर्ववत झाल्यानंतरच तेथील संस्था सुरू ठेवता येणार आहेत. सरावासाठी प्रत्येक हाॅलमध्ये टायपिंग यंत्रात 7 चाैरसफूट अंतर ठेवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांची उपस्थितीची नोंदवही दररोज ठेवावी लागणार आहे. सर्व संस्था सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू ठेवता येतील. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी सॅनिटायझरचा वापर करणे, रविवारी संस्था बंद ठेवणे, सर्दी, खोकला असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निशिद्ध करणे, शासनमान्य फी घेणे, शक्यतो हॅण्डग्लोजचा वापर करणे, मास्क लावणे, एकाचवेळी किमान पाच उमेदवार व एक अध्यापकांना प्रवेश देणे, विद्यार्थी येत असलेल्या परिसरात कोरोना रुग्ण नसणे, प्रत्येक उमेदवाराचे कार्ड तयार करून तापमान, सर्दी खोकला आदी नोंदी ठेवणे, अशा अटींवर संस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे कराळे यांनी सांगितले.

