सोनई : शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील घरी भेट देवून (कै.) गौरी प्रशांत गडाख यांच्या निधनाबद्दल सांत्वन केले.
यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी यांच्यावर काल अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज नार्वेकर सांत्वन भेटीसाठी हेलिकॉप्टरने मुळा पब्लिक स्कुल येथे आले. तेथून ते व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर मोटारीने गडाख वस्तीवर पोचले.
या वेळी उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, नगरचे आमदार संग्राम जगताप, आदर्श हिवरेबाजारचे पोपटराव पवार उपस्थित होते. गडाख यांच्या निवासस्थानी मंत्री शंकरराव गडाख, प्रशांत गडाख, सेवा संस्थेचे अध्यक्ष विश्वास गडाख यांची भेट घेवून नार्वेकर यांनी सांत्वन केले.
झालेली घटना खुपच मनाला धक्का देणारी आहे. या दु:खातून सर्व परिवार लवकर सावरावा. गडाख परिवार हा केवळ एक परिवार नसून, नेवासे परिसरासाठी त्यांचे मोठे काम असल्याने तो अनेकांचा आहे. महाराष्ट्रात या परिवाराचे वेगळे स्थान आहे. त्यामुळे या दुःखातून लवकर सावरावे, अशी अपेक्षा नार्वेकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, काल (कै.) गाैरी गडाख यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. काल दिवसभर सोनई ग्रामस्थांनी बंद ठेऊन श्रद्धांजली अर्पण केली. सोनई येथे आज दिवसभर सोनई येथील नागरिक व कार्यकर्त्यांनी गर्दी केली. गडाख कुटुंबियांना भेटून अनेकांनी सांत्वन केले. नार्वेकर आले त्या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. शिवसेनेचे इतर पदाधिकारी व नेते या वेळी उपस्थित होते.
यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून गाैरी गडाख यांनी महिलांसाठी विविध कामे केली होती. त्यामुळे नेवासे तालुक्यातील सर्व महिलांमध्ये त्यांच्याविषयी आदर होता. वहिनीसाहेब म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने तालुक्यातील महिला शोकसागरात बुडाल्या. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी गाैरी यांची कायम धडपड असे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा, असे त्या कायम म्हणत. याबाबत कालपासून महिलांमध्ये हीच चर्चा सुरू आहे.

