काॅंग्रेस जन हो, सावध व्हा ! अन्यथा आघाडीतील सर्वात तोट्यातील पक्ष ठरेल - Congress people, be careful! Otherwise it will be the most losing party in the lead | Politics Marathi News - Sarkarnama

काॅंग्रेस जन हो, सावध व्हा ! अन्यथा आघाडीतील सर्वात तोट्यातील पक्ष ठरेल

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

वेळीच सावध झाले नाही,तर परिस्थिती आणखी गंभीर होईल. केवळ `महाविकास आघाडी सरकारचा एक भागीदार` आणि त्यातुन मिळालेली काही मंत्रीपदे, एवढ्यावर समाधानी राहून चालणार नाही.

नगर : भिवंडीतील काॅंग्रेसचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, हा योगायोग नसून, ती काॅंग्रेसच्या दृष्टीने धोकादायक घटना आहे. काॅंग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी वेळीच सावध व्हायला हवे. सरकारमध्ये काॅंग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांची किती कामे होतात, याबाबत आता सावध व्हायला हवे, अन्यथा महाविकास आघाडीतील सर्वात तोट्याचा पक्ष काॅंग्रेस ठरेल, असा सावधानतेचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी दिला आहे.

देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रातून आपली खदखद व्यक्त केली आहे. ते म्हणतात, की वेळीच सावध झाले नाही,तर परिस्थिती आणखी गंभीर होईल. केवळ `महाविकास आघाडी सरकारचा एक भागीदार` आणि त्यातुन मिळालेली काही मंत्रीपदे, एवढ्यावर समाधानी राहून चालणार नाही. एका बाजुला शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची ताकद, तर दुरऱ्या बाजुला राष्ट्रवादीची आक्रमकता, अशा परिस्थितीत गावोगावचे काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सरकारमध्ये काँग्रेसचाही सहभाग आहे, हे काॅंग्रेसच्या हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना जाणवायला हवे. सरकारच्या निर्णयात काॅग्रेसच्या ध्येय धोरणांचा प्रभाव दिसायला हवा. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना `शिवसेनेशी जुळवून घ्या`, अशा सूचना देण्यात आल्या आणि 
 त्याचदिवशी भिवंडीतील १८ काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश सोहळा झाला. हा केवळ योगायोग नव्हे, असा आरोप त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील पारनेर येथील काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी त्यात तातडीने हस्तक्षेप करून या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठविले. त्यावेळी महविकास आघाडीच्या घटक पक्षातील परस्पर संबंधांची चर्चा झाली. आणि किमान आप आपसातील कार्यकर्त्यांचे पक्षांतर टाळले जाण्याची अपेक्षा व्यक्त झाली. मग भिवंडीतील काँग्रेस नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश कसा काय दिला जातो, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत काॅंग्रेस नेत्यांनी तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीत हे प्रश्न विचारायला हवेत. अन्यथा तीन पक्षांच्या "महाविकास आघाडी सरकार" मध्ये सर्वात मोठा तोट्यातील पक्ष काँग्रेस पक्ष ठरेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ नेत्यांनी या घटनांचा गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख