नगर : शहरात काॅंग्रेसने संघटनात्मक बैठक घेऊन नव्या बदलाची नांदी ठरली आहे. संघटन वाढविणे, नव्याने कार्यकर्ते जोडणे, जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मुसंडी मारण्याचे संकेत या बैठकित देण्यात आले. आमदार डाॅ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे आदींच्या मार्गदर्शनाखाली आज शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जोरदार बॅटिंग केली.
काळे यांच्या शहर जिल्हाध्यक्ष निवडीनंतर आज शहर कॉंग्रेसची पहिली संघटनात्मक बैठक माऊली मंगल कार्यालयात झाली. व्यासपीठावर आमदार कानडे, आमदार तांबे काळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी महापौर दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, विविज्ञ माणिकराव मोरे आदी उपस्थित होते.
नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी
आमदार तांबे म्हणाले की, शहरातील पक्षसंघटना बांधणीची जोरदार सुरवात झाली असून किरण काळे हे नव्या दमाच्या चेहऱ्यांना हेरून त्यांना काँग्रेस पक्ष संघटनेमध्ये योग्य ते स्थान देतील. संघटनेत स्थान देत असताना जो कार्यकर्ता कोणत्याही गोष्टीला बळी न पडता पळून जाणार नाही, काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहील, अशाच कार्यकर्त्यांना त्यांनी संधी द्यावी, असा सल्ला या वेळी आमदार तांबे यांनी या वेळी दिला.
नगर शहरात जोरदार बांधणी
आमदार कानडे म्हणाले की, किरण काळे हे स्वतः कलाकार आहेत. उच्चशिक्षित आहेत. त्यांना सामाजिक कार्याचा वारसा आहे. त्यामुळे असे सर्वगुणसंपन्न प्रतिभान युवा नेतृत्व नगर शहर काँग्रेसला मिळाल्यामुळे नगर शहरात निश्चितपणे काँग्रेसची संघटना ही अल्पावधीत उभी राहील. या ठिकाणी असणारी मोठी उपस्थिती ही नगर शहरातील काँग्रेस पक्षाच्या आगामी जोरदार बांधणीची नांदी आहे.
चार पक्षांचे उंबरे झिजवणाऱ्यांना स्थान नाही : काळे
या वेळी काळे यांनी आवेशपूर्ण आणि आक्रमकपणे भाषण केले. ते म्हणाले की, जे लोक चार पक्षांचे उंबरे झिजवतात, अशांना इथून पुढे पक्षात कवडीचीही किंमत दिली जाणार नाही. अशांनी दिल्या घरी सुखी राहावे. आम्ही फाटक्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊ. गोरगरिबांना पुढे आणू. सामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या माध्यमातून नेता बनवू. पण पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना इथून पुढं कोणत्याही परिस्थितीत पक्षात थारा दिला जाणार नाही.

