सरकारबाबत काॅंग्रेसची खदखद उघड ! या पदाधिकाऱ्याने फोडले चर्चेला तोंड

शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस हे दोन्ही पक्ष सरकारचा उपयोग आक्रमकपणे करून त्यांच्या पक्षवाढीसाठी करतात. त्या तुलनेत काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे व पदाधिकाऱ्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते.
सरकारबाबत काॅंग्रेसची खदखद उघड ! या पदाधिकाऱ्याने फोडले चर्चेला तोंड
deshmukh.png

नगर : राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या काॅंग्रेसच्या मंत्र्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व अखिल भारतीय काॅंग्रेसचे सदस्य विनायकराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली आहे.

देशमुख यांनी पाटील यांची भेट घेऊन व्यथा मांडली आहे. राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस हे दोन्ही पक्ष सरकारचा उपयोग आक्रमकपणे करून त्यांच्या पक्षवाढीसाठी करतात. त्या तुलनेत काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे व पदाधिकाऱ्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते. काॅंग्रेसच्या मंत्र्यांनी पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. याबाबत प्रभारी या नात्याने आपण सर्व मंत्र्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी देशमुख यांनी पाटील यांच्याकडे केली आहे. 

या वेळी झालेल्या चर्चेत देशमुख यांनी पाटील यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. राज्यातील अनेक पदे रिक्त आहेत. किंबहुना काहींकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. अशा ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. महिला काॅंग्रेस, युवक काॅंग्रेस, एनएसयुआय, या संघटनांची रिक्त पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर संघटनात्मक कामांचे सतरा विभाग आहेत. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर या विभागांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही त्वरीत कराव्यात. तालुकास्तरावरील बैठका नियमित घेतल्या जाव्यात. त्यांचा अहवाल पक्ष कार्यालयाकडे द्यावा. विभागस्तरीय कार्यकर्त्यांचे मेळावे व्हावे, शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा देशमुख यांनी पाटील यांच्याकडे व्यक्त केली आहे.

याबाबत पाटील यांनी देशमुख यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या निमित्ताने काॅंग्रेसमधील अंतर्गत खदखद उघड होऊ लागली आहे. एका चर्चेला तोंड फुटले आहे. तीनही पक्ष हे महाराष्ट्र सरकारची तीन चाके आहेत. ऐकीकडे भाजप सडोतोड टीका करीत असताना या तिनही पक्षाला समान वागणूक असायला हवी, असेच कार्यकर्त्यांचे मत आहे. याबाबत काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी आता उघडपणे बोलणे सुरू केले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in