शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे गुरुवारी आंदोलन - Congress agitation on Thursday to support the farmers' movement | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे गुरुवारी आंदोलन

आनंद गायकवाड
बुधवार, 2 डिसेंबर 2020

कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एवटला आहे. सात दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत.

संगमनेर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काॅंग्रेसने पाठिंबा दर्शविला असून, त्यानिमित्त उद्या (गुरुवारी) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही दिली.  

भाजपा सरकारच्या या शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवलेला आहे. हे काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मागील दोन महिने सातत्याने विविध आंदोलने केली. आपला विरोध व्यक्त केलेला आहे. किसान व्हर्च्युअल महामेळावा, किसान हक्क दिवस, जिल्ह्या-जिल्ह्यात धरणे आंदोलन, राजभवनवर पदयात्रा काढून राज्यपालांना निवेदन दिले, ट्रॅक्टर रॅली काढल्या, काळ्या कायद्याविरोधात सह्यांची मोहिम राबवण्यात आली. यात राज्यभरातील 60 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी सहभाग नोंदवला होता. उद्याच्या आंदोलनातही मोठ्या संख्येने लोक सहभागी होऊन आपला विरोध व्यक्त करतील.

कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एवटला आहे. सात दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या मनात या काद्याविषयी काही शंका आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन केंद्र सरकारने त्यांना आश्वस्त केले पाहिजे. भाजपा सरकार जाहिरपणे हे कायदे शेतकर्‍यांच्या हिताचे आहेत असे सांगत आहे, परंतु शेतकर्‍यांचे त्यातून समाधान होत नाही.

शेतकरी कृषी कायद्यात बदल करण्याची मागणी करत आहेत त्याप्रमाणे केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा. शेतकर्‍यांच्या मागण्या रास्त असून, आम्ही शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबरपणे उभे आहोत, असेही थोरात म्हणाले.

दरम्यान, उद्या होणाऱ्या आंदोलनासाठी महाराष्ट्रभर नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊन केंद्राने केलेला कायदा रद्द करावा, अशी मागणी करणार आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आतापर्यंत जिल्ह्यातून पाठिंबा देण्यात आला असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सरकारने या कायद्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी समाजातील मान्यवरांकडून होत आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख