शेवगाव तहसिल कार्यालयात गोंधळ, कार्यालयास टाळे, आठ जणांविरोधात गुन्हा - Confusion in Shevgaon tehsil office, lock of office, crime against eight persons | Politics Marathi News - Sarkarnama

शेवगाव तहसिल कार्यालयात गोंधळ, कार्यालयास टाळे, आठ जणांविरोधात गुन्हा

सचिन सातपुते
मंगळवार, 30 मार्च 2021

तहसिल कार्यालयातील या गोंधळ व हाणामारीच्या प्रकारामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकून काम बंद करत निषेध व्यक्त केला.

शेवगाव : वैयक्तिक कारणासाठी तहसील कार्यालयात एकमेकांशी वाद घालून गोंधळ करणाऱ्या व शासकीय कामकाजात अडथळा आणणाऱ्या दोन गटातील आठ ते नऊ जणांविरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नायब तहसिलदार विकास जोशी यांनी फिर्याद दिली. 

विशाल विजयकुमार बलदवा, विजयकुमार बलदवा (रा. शेवगाव) या पिता-पुत्रासह इतर आठ ते नऊ अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तहसिल कार्यालयात वादावादीत करत गोंधळ घालणाऱ्या दोन गटातील वादातून मिनाक्षी भाऊसाहेब कळकुंबे (रा. आव्हाणे) खुर्द यांच्या फिर्यादीवरुन बलदवा पिता-पुत्रांवर जातीवाचक शिवीगाळ, छेडछाडीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान, तहसिल कार्यालयातील या गोंधळ व हाणामारीच्या प्रकारामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकून काम बंद करत निषेध व्यक्त केला. 

कार्यालयात आज सकाळी 12 च्या सुमारास कामकाज सुरू होते. तहसिलदार दालनाच्या बाहेर गोंधळाचा आवाज आला. तेथे विशाल बलदवा व त्याचे वडील विजयकुमार बलदवा यांच्यात व इतर सात आठ जणांमध्ये मारामारी सुरू होती. त्यांच्या गोंधळामुळे आम्हाला कामकाज करणे अवघड बनले. बलदवा यांनी तहसिलदार अर्चना पागिरे - यांच्याशी उद्धट भाषा वापरली. या कारणास्तव बलदवा पिता पुत्रांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. 

मिनाक्षी कळकुंबे यांनी दिलेल्या दुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज मुलगा संकेत याच्यासह स्वस्त धान्य दुकानाच्या कामासाठी तहसिल कार्यालयात गेले असता कार्यालयाच्या आवारातील तलाठी कार्यालयासमोरुन पुरवठा शाखेकडे जात असतांना विशाल बलदवा हा एका स्कुटी जवळ उभा होता. तेथून माझ्याकडे पाहून जातीवाचक शिवीगाळ करत माझ्याशी झटापट करत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच गळ्यातील दीड तोळा सोन्याचे गंठण तोडले. त्यामुळे मी घाबरुन आरडा ओरड केल्याने मुलगा संकेत व इतर काही लोक तेथे आले. त्यांनी मला त्याच्या तावडीतून सोडवले. या झटापटीत माझा मोबाईल पडून फुटला. या वेळी विशाल बलदवा याचे वडील विजयुकमार बलदवा ही तेथे होते. त्यांनीही जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे या दोघांविरुध्द शिवीगाळ, छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकाराची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख