कोविड सेंटरवरून खडाजंगी, श्रीरामपूर पालिकेच्या सभेत गोंधळ - Confusion in the meeting of Khadajangi, Shrirampur Municipality from Kovid Center | Politics Marathi News - Sarkarnama

कोविड सेंटरवरून खडाजंगी, श्रीरामपूर पालिकेच्या सभेत गोंधळ

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनीही, संगमनेर, राहुरी येथे कोविड रुग्णालये सुरू होऊ शकतात, तर येथे का नाही, असा सवाल केला. त्यावर सभेत चांगलीच खडाजंगी झाली.

श्रीरामपूर : नगरपालिकेची सर्वसाधारण सभा काल ऑनलाइन पार पडली. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने, नगरपालिकेने पुढाकार घेऊन कोविड रुग्णालय उभारण्याची मागणी नगरसेविका भारती कांबळे यांनी केली. त्यावर नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी, तुम्हीच जबाबदारी घेऊन कोविड रुग्णालय सुरू करा, असे उत्तर दिले.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनीही, संगमनेर, राहुरी येथे कोविड रुग्णालये सुरू होऊ शकतात, तर येथे का नाही, असा सवाल केला. त्यावर सभेत चांगलीच खडाजंगी झाली. 

नगरपालिकेच्या आज झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत विविध प्रश्‍नांवर नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते. कोविड सेंटरच्या विषयावर नगरसेविका कांबळे व नगराध्यक्ष आदिक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. उपनगराध्यक्ष ससाणे यांनीही, इतर ठिकाणी कोविड रुग्णालये सुरू होतात, मग श्रीरामपुरात का नाही, असा सवाल केला. त्यावर, जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यास शहरात कोविड रुग्णालय सुरू करता येणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी स्पष्ट केले. 
नगरसेवक अंजूम शेख व मुजफ्फर शेख यांनी, संगमनेर रस्त्यावरील बालसुधारगृहाच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्‍सचे आरक्षण असून, टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी तेथे इमारत बांधण्याची सूचना केली. टाऊन हॉल, वॉल कंपाउंडचे काम ठेकेदाराने नियमाप्रमाणे करणे गरजेचे होते. तसे झाले नाही. त्यामुळे बिल काढले जाऊ नये, अशी मागणी श्रीनिवास बिहाणी यांनी केली.

घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका देऊन एक महिना होऊनही, प्रभाग दोनमधील स्वच्छतेचे काम अद्याप सुरू झाले नसल्याकडे मुजफ्फर शेख यांनी लक्ष वेधले. नगरसेवक राजेंद्र पवार यांनी, शहरातील सुयोग मंगल कार्यालयाला घरगुती दराने करआकारणी केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरही गदारोळ झाला. 
ऑनलाइन सभेत नगरसेवक जितेंद्र छाजेड, श्‍यामलिंग शिंदे, मुख्तार शहा, संतोष कांबळे, निलोफर शेख, अक्‍सा पटेल, प्रकाश ढोकणे, रवी पाटील, दिलीप नागरे, कलीम कुरेशी, तरन्नूम शेख, ताराचंद रणदिवे यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. 

अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा 

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही नगरसेवक बोलण्यास उभे राहिले तेव्हा सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या माइकचा आवाज जाणीवपूर्वक "म्यूट' केला. त्यामुळे सत्ताधारी या नगरसेवकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचा आरोप नगरसेविका स्नेहल खोरे यांनी या वेळी केला.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख