नगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. तसेच त्यांचा गुन्हा दाखल करून घेण्यास 5 ते 6 तास त्यांना बसून ठेवले. त्यामुळे संबंधित पोलिस निरीक्षकांवर प्रशासकीय कारवाई व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले असून, त्यावर संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांची सही आहे. निवेदनात म्हटले आहे, की जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी काल तहसीलदार ज्योती देवरे यांच्या दालनात येऊन व कार्यकर्ते जमा करून इतर कर्मचाऱ्यांसमोर अश्लिल भाषेत शिविगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळे आणले. तसेच यापूर्वीही तहसीलदार देवरे या कोविड आजाराच्या उपचारार्थ रुग्णालयात दाखल असताना रात्रीअपरात्री भ्रमणध्वनीद्वारे अश्लिल भाषेत शिविगाळ करून दरमहा खंडणी देण्याबाबत धमकाविले होते. एका महिला तहसीलदाराच्या बाबतीत असे कृत्य झाल्याने झावरे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
सुप्रिया झावरे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्त्व रद्द करावे
सुजीत झावरे यांच्या आई सुप्रिया झावरे या जिल्हा परिषद सदस्य असून, आगामी काळातही त्यांच्याकडून तहसीलदारांबाबत खोट्या तक्रारी करण्याची शक्यता असल्याने त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्त्व रद्द करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
पोलिस निरीक्षकांवर कारवाई व्हावी
तसेच या घटनेच्या नंतर तहसीलदार देवरे यांनी झावरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. तेथे संबंधित पोलिस निरीक्षकांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यासाठी देवरे यांना पाच ते सहा तास बसून ठेवले. कामात कसूर केल्याने संबंधित पोलिस निरीक्षकांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

