`भाजपवाले या, आपले स्वागत आहे !` रोहित पवारांनी भाजपच्या `चाणक्य`चे असे केले स्वागत - Come to BJP, you are welcome! पवार Rohit Pawar welcomed BJP's 'Chanakya' like this | Politics Marathi News - Sarkarnama

`भाजपवाले या, आपले स्वागत आहे !` रोहित पवारांनी भाजपच्या `चाणक्य`चे असे केले स्वागत

नीलेश दिवटे
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

येथील नगरपंचायतची मुदत संपली असून, तेथे प्रशासक नियुक्त आहेत. त्यामुळे सध्या निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून, मार्च महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

कर्जत : `भाजपवाले या, आपले स्वागत आहे` असे म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे व माजी मंत्री राम शिंदे यांचे विश्वासू असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांचे स्वागत केले.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस व राजकीय क्षेत्रातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रसाद ढोकरीकर यांनी आज कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची सदिच्छा भेट घेतली, तसेच त्यांचा फेटा बांधून सन्मान केला. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र भाजप सोशल मीडियाचे विक्रांत ढोकरीकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, युवक नेते ऋषिकेश धांडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेलार, उमेश जेवरे, दिलीप जाधव आदी उपस्थित होते. या भेटीमागील नेमके काय गुपीत आहे, याबाबत मात्र चर्चा रंगू लागली आहे.

येथील नगरपंचायतची मुदत संपली असून, तेथे प्रशासक नियुक्त आहेत. त्यामुळे सध्या निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून, मार्च महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नगरपंचायत सत्ता खेचून आणण्यासाठी, तर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरपंचायत सत्ता कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

कर्जत नगरपंचायत भाजपच्याच ताब्यात राहील, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी जोगेश्वरवाडी येथील कार्यक्रमात केले होते. तसेच काल शहरात वसुंधरा व स्वच्छता अभियानात शहर स्वच्छता करणारी विविध सामाजिक संघटनांच्या स्वच्छता दूता बरोबर श्रमदान केले होते. भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर हे भाजपचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते असून, ते माजी मंत्री राम शिंदे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. याच बाबीमुळे त्यांची आमदार रोहित पवार यांची घेतलेली भेट, फेटा बांधून केलेला सन्मान आणि ते भेटण्याची वेळ घेत गेल्यानंतर आमदार पवार यांनी `भाजपवाले या, आपले स्वागत आहे` असे म्हणून केलेले हस्तांदोलन, दोघांनी संक्रातीच्या मुहूर्तावर एकमेकांना दिलेले तिळगtळ घ्या गोड बोला, असे म्हणत दिलेले तिळगुळ सध्या चर्चेत असून, तर्कवितर्क वाढविले जात आहे.

 

पवारांना दिले कार्यक्रमाचे निमंत्रण

येत्या 22 तारखेला व्यासायिक दुकानाचा प्रारंभ करीत असून, त्या कार्यक्रमाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून निमंत्रण द्यायला गेलो होतो. तसेच प्रथमच भेटत असल्याने व आदिनाथ साखर कारखाना चालविण्यास घेऊन तालुक्यातील बावीस गावातील उउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल कुटुंबियांच्या वतीने त्यांचा सत्कार केला, यात गैर काय ? असा सवाल प्रसाद ढोकरीकर  यांनी उपस्थित केला.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख