नगरची कोरोनामुळे परिस्थिती बिघडल्यास जिल्हाधिकारी जबाबदार : डाॅ. विखे पाटील - Collector responsible if the situation worsens due to corona of the town: Dr. Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

नगरची कोरोनामुळे परिस्थिती बिघडल्यास जिल्हाधिकारी जबाबदार : डाॅ. विखे पाटील

मुरलीधर कराळे
गुरुवार, 16 जुलै 2020

दहा दिवसांपूर्वी स्वॅब घेवूनही नागरिकांना अहवाल मिळत नाहीत. संबंधित रुग्णांची काय अडचण होत असेल, याची कल्पना न केलेली बरे. महापालिका क्षेत्रात व ग्रामीण भागात रोज दोनशे च्या दरम्यान रुग्ण वाढत आहेत.

नगर : कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाने आता सावध भुमिका घ्यायला हवी. नगरमध्ये कर्फ्यू लावावा. खासदार म्हणून नव्हे, तर डाॅक्टर म्हणून सांगतोय आहे. जनता कर्फ्यू लावला नाही, तर परिस्थिती अधिक धोकादायक होईल. असे झाल्यास त्याच्या परिणामाला सर्वस्वी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हेच जबाबदार राहतील, असा इशारा खासदार डाॅ. सुजय  विखे पाटील यांनी दिला.

पत्रकारांशी बोलताना डाॅ. विखे पाटील म्हणाले, की दहा दिवसांपूर्वी स्वॅब घेवूनही नागरिकांना अहवाल मिळत नाहीत. संबंधित रुग्णांची काय अडचण होत असेल, याची कल्पना न केलेली बरे. महापालिका क्षेत्रात व ग्रामीण भागात रोज दोनशे च्या दरम्यान रुग्ण वाढत आहेत. विळद घाटातील लॅबमध्ये 429 जणांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल 137 पाॅझिटिव्ह आढळले. याचा अर्थ रुग्ण सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. स्वॅब घेतल्यानंतर चोवीस तासात अहवाल येण्यास काय अडचण आहे. जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये एक हजारांपेक्षा जास्त अहवाल प्रलंबित आहेत. अहवाल प्रलंबित राहिल्यानंतर एखादा रुग्ण कोरोनाबाधित असेल, तर त्याच्या घरच्या लोकांना लगेचच कोरोना होईल, हे प्रशासनाला कळत नाही काय. याच कारणाने रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शहरात तातडीने जनता कर्फ्यू लावण्याची गरज आहे. तसे न केल्यास कोरोनाचा फैलाव वाढणार आहे. त्यास जिल्हाधिकारी हेच जबाबदार राहतील.

नगरकर हबकले

दरम्यान, नगर शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. संपूर्ण शहरात जनता कर्फ्यू लावण्याची मागणी नागरिक व भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे. कोरोनाला रोखणे आता प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याची स्थिती असल्याचे नागरिक बोलत आहेत. प्रत्येकाला कोणत्याही प्रसंगी कोरोनाचा बळी पडतो की काय, अशी भिती वाटत आहे. 

अनेक गावे बंद

नगर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे अनेक गावे बंद ठेवली जात आहेत. गावात एक रुग्ण सापडला, तरीही गाव बंद करण्याचा निर्णय सरपंच घेत आहेत. त्याला इतर सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ साथ देत आहेत. त्यामुळे लोकांचे व्यवहार ठप्प होत असून, जीवनावश्यक वस्तू मिळविणे मुश्किल होत आहे. नगर तालुक्यातील जनतेचा नगर शहरात रोज संपर्क येतो. भाजीपाला, दुग्दोत्पादन या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना शहरात जावेच लागते. त्या पार्श्वभूमीवर नगर शहर बंद ठेवल्यास तालुक्यात वाढणारा कोरोना कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जनता कर्फ्यू लावावा, अशी मागणी नगरकरांमधूनही होत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख