अकोले : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी तातडीने पंचनामे करून घ्यावेत. पंचनाम्याच्या त्रुटीमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी व आपले काम गुणवत्तापूर्ण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.
विजयदशमीच्या दिवशी भोसले यांनी अकोले तालुक्यातील करंडी गावाला भेट दिली. तेथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांशी सवांद साधला. जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर प्रथमच ते तालुक्यात आले असल्याने करंडीचे सरपंच चंद्रकांत गोंदके यांनी डाॅ. भोसले यांचा सत्कार करून स्वागत केले.
भोसले म्हणाले, मी शेतकऱ्यांचे दुःख समजून घ्यायला आलो आहे. मला सत्कार नको. त्यांना मदत मिळाल्यावर सत्कार घ्यायला येईल. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी तसेच अधिकारी उपस्थित होते. भात पिके कोणती घेतली, कोणते बियाणे, खते वापरली, शेतीवर किती लोक अवलंबून आहेत, पीक विमा आहे का? याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. संगमनेर तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन ते अकोले तालुक्यात आले.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे माझ्या निदर्शनास आले असून, प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल, यासाठी गतीने पंचनामे करून व परस्पर समन्वय ठेवून त्रृटी न ठेवता गुणवत्तापूर्ण गतीने पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे अशा सूचना त्यांनी कल्या. या वेळी सरपंच चंद्रकांत गोंदके यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
दरम्यान, माजी आमदार वैभव पिचड यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी विविध कार्यक्रमातून केली. जिल्हाधिकाऱ्यांचेही नुकसानग्रस्त भागाकडे लक्ष वेधले. अकोले तालुका दुर्गम भागापैकी आहे. आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भातपिकाचे झालेले नुकसान भरून निघणारे नाही, त्यामुळे सरकारने जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना करावी, अशी भूमिका पिचड यांनी व्यक्त केली आहे. नुकसानीच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी काळात अकोले तालुक्यातील शेतकरी वंचित राहणार नाही, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही पिचड यांनी विविध कार्यक्रमांतून केली आहे. सरकारने काही नुकसानभरपाई जाहीर केली असली, तरी ती पूरक नाही, असे मत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

