Collector angry! How do hospitals send swabs to each other? | Sarkarnama

परस्पर स्वॅब पाठविणाऱ्या रुग्णालयांची जिल्हाधिकाऱ्यांकडून झाडाझडती

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

आयसीएमआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासणीसाठी स्वॅब नमुने घेणे गरजेचे आहे. आयसीएमआरने कोरोना निदानासाठी मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेकडेच नमुने तपासणीसाठी पाठवावेत.

नगर : जिल्ह्यातील काही रुग्णालये व प्रयोगशाळा जिल्हा प्रशासनास न कळवता स्वॅब (घशातील स्राव) नमुने तपासणीसाठी परस्पर पाठवीत आहेत. तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यावर रुग्णांसंदर्भात योग्य ती दक्षता घेत नाहीत. आरोग्य विभागास रुग्णांची माहितीही कळवीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांना स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यासंदर्भात मार्गदर्शक आदेश जारी केले. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. 

आदेशात म्हटले आहे, की "आयसीएमआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासणीसाठी स्वॅब नमुने घेणे गरजेचे आहे. आयसीएमआरने कोरोना निदानासाठी मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेकडेच नमुने तपासणीसाठी पाठवावेत. खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांनी तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांचा दैनंदिन अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवावा. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवावे. त्यांना डिस्चार्ज देऊ नये. कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करावे. 

नगरमध्ये 24 तासांत 300 चाचण्यांची क्षमता 

कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची तातडीने तपासणी होण्यासाठी जिल्हा रुग्णालयात कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. ही जिल्हा रुग्णालय स्तरावरील (वैद्यकीय महाविद्यालय संलग्न नसताना) राज्यातील पहिलीच लॅब आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये शंभर, याप्रमाणे 24 तासांत 300 चाचण्या करण्याची या लॅबची क्षमता असणार आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अधिकृत मान्यतेनंतर या चाचण्यांना सुरवात होणार आहे. 
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज या लॅबची पाहणी केली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे आदी उपस्थित होते. आयसीएमआर लवकरच या ठिकाणी चाचण्यांना परवानगी देईल, अशी खात्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा...

शहर बससेवाही आज सुरू होण्याची शक्‍यता 

नगर : महापालिकेची शहर बससेवा शुक्रवार दुपारपासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठीची तयारी महापालिका प्रशासन व दीपाली ट्रान्स्पोर्टकडून सुरू आहे, अशी माहिती दीपाली ट्रान्स्पोर्टचे संचालक प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यामुळे आता शहरातील जनजीवन शुक्रवारपासून सुरळीत होण्याची शक्‍यता आहे. हे पाहता महापालिका प्रशासनाने शहर बससेवा सुरू करण्याच्या हालचाली आज सुरू केल्या. महापालिकेने दीपाली ट्रान्स्पोर्टला शहर बससेवा सुरू करण्यास सांगितले. मात्र, चालक-वाहक लॉकडाउनमुळे घरी अथवा गावी गेल्याने ते पुन्हा कामावर येण्यासाठीच्या हालचाली आज सुरू होत्या. उद्या दुपारनंतर टप्प्या-टप्प्याने मागणीनुसार बससेवा सुरू करण्यात येणार आहे. एमआयडीसीमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी शहर बस वाहतूक सेवा सुरूच होती. आता उर्वरित ठिकाणी मागणीनुसार बससेवा सुरू होईल, असे प्रा. गाडे यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख