नगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आज 411 कोरोना रुग्णांची नव्याने भर झाली. गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत असल्याने नगर शहरातील दोन कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आतापर्यंत 788 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, 51 हजार 10 रुग्णांची नोंद झाली आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या, तालुका पातळीवर सुरू झालेले कोविड सेंटर व होम आयसोलेशनमुळे शहरातील कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या कमी झाली. शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. शहरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेने आनंद लॉननंतर आता शासकीय तंत्रनिकेतनमधील रोटरी कोविड सेंटरही बंद केले. हे कोविड सेंटर 72 दिवस चालले. त्यात 1524 रुग्णांनी उपचार घेतले.
कोविड सेंटरसाठी महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतनमधील मुले-मुलींची वसतीगृहे ताब्यात घेतली होती. ही वसतीगृहे सॅनिटाईज केली आहेत. मात्र, अजूनही ती महापालिकेच्या ताब्यात आहेत. शहरातील आयुर्वेद कॉलेजमधील गुरूआनंद कोविड सेंटरही कॉलेज प्रशासनाने बंद केले. आता शहरातील खासगी हॉस्पिटलव्यतिरिक्त नटराज हॉटेल, जैन पितळे बोर्डिंग, बूथ हॉस्पिटल व कर्मयोगी सेंटर येथे कोविड सेंटर सुरू आहेत.
जिल्ह्यात आज १ हजार ४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ८३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज रूग्ण संख्येत ४११ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ३८५ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९४ आणि अँटीजेन चाचणीत २२० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५९, जामखेड १, कोपरगाव १, नगर ग्रामीण २, नेवासा १, पारनेर १०, पाथर्डी १, राहाता २, राहुरी १, श्रीगोंदा १८, मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ९४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २७, अकोले २, जामखेड ३, कर्जत १, कोपरगाव ७, नगर ग्रामीण १२, पारनेर ६, पाथर्डी ३, राहाता ९, राहुरी ८, संगमनेर ६, श्रीगोंदा ३, श्रीरामपूर ६, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २२० जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १०, अकोले २२, जामखेड ११, कर्जत ८, कोपरगाव ११, नेवासा १९, पारनेर १३, पाथर्डी ४, राहाता १७, राहुरी १४, संगमनेर ३२, शेवगाव २३, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

